देवेंद्र फडणवीस रामाचा अवतार असल्याचंही जाहीर करून टाका – विखे पाटील

रायगड माझा वृत्त

नरेंद्र मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपाने जाहीर केलेलेच आहे. आता देवेंद्र फडणवीस रामाचा अवतार असल्याचेही जाहीर करून टाका, म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच ‘राम राज्य’ अवतरेल असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. जनसंघर्ष यात्रेच्या जालना येथील जाहीरसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

यावेळी बोलताना विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली. ‘सरकार नावाची व्यवस्था राज्यात आहे की नाही असा प्रश्न पडतो. राज्य सरकार दळभद्री आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावलेला आहे. सरकार जनतेसंबंधी राजधर्म पाळत नाही’, अशी टीका केली आहे.

‘सरकार 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करणार होतं. पण जनसंघर्ष यात्रेला घाबरुन आधीच 23 ऑक्टोबरला दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन टाकली’, असंही ते म्हणाले. ‘शेतकऱ्यांना कोणत्याही सवलती देण्यास सरकार तयार नाही. माणसं मरत असताना राज्य सरकार उत्सव साजरं करणार आहे’, अशी टीका त्यांनी केली.

‘अपघाताने यांना सत्ता मिळाली आहे. देव देतो आणि कर्म नेतं अशी परिस्थिती झाली आहे’, असा टोला त्यांनी लगावला. ‘या सरकारने जाहिरात करण्यासाठी एकही जागा सोडली नाही. फक्त सुलभ शौचालय सोडलं आहे. काही दिवसांनी तेथेही जाहिरात द्यायला कमी पडणार नाहीत’, असाही टोला त्यांनी लगावला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत