देशाची वाटचाल अराजकतेकडे ; खासदार सावित्रीबाई फुलेंचे आणखी एक वादग्रस्त विधान

लखनऊ: रायगड माझा

मोहम्मद अली जिना यांच्या छायाचित्रावरुन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आता आपल्याच पक्षाला घराचा आहेर दिला आहे. देश अराजकतेकडे चालला आहे, अशा शब्दांमध्ये मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘दलितांसाठी वंदनीय असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याच्या घटना देशभरात घडत आहेत. मात्र पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. हे अराजक नाही, तर काय आहे?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फक्त मीच नाही, तर सर्वोच्च न्यायालयातील वकीलदेखील हेच म्हणत असल्याचे त्यांनी म्हटले.

‘कधी म्हटले जाते की, आम्ही भारताच्या संविधानात बदल करण्यासाठी आलो आहोत. कधी म्हटले जाते की, आम्ही आरक्षण काढून टाकू. तर कधी, भारताचे संविधान अशाप्रकारे संपवू की ते असून-नसून सारखेच असेल, अशीही विधाने केली जातात. देशाचे संविधान, आरक्षण संपल्यास फक्त बहुजन समाजच नव्हे, तर संपूर्ण देशातील लोकांचे अधिकार संपुष्टात येतील,’ असे सावित्रीबाई फुले यांनी म्हटले.

मोहम्मद अली जिना यांच्या छायाचित्रावरुन झालेल्या वादातही सावित्रीबाई फुले यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपाचे नेते मोहम्मद अली जिना यांच्याविरोधात विधान करत असताना फुले यांनी जिना यांचे कौतुक केले होते. जिना हे महापुरुष होते आणि कायम राहतील, असे त्यांनी म्हटले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत