दोन वेळा खड्डे भरूनही रस्त्यावरील खड्डे जैसे थे!

नेरळ : कांता हाबळे

कर्जत -कल्याण राज्यमार्ग आणि नेरळ -कळंब जिल्हा मार्गावर पावसाळ्यात दोन वेळा खड्डे भरूनही रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे. कर्जत-कल्याण राज्य मार्गावर तर एकेरी वाहतूक सुरू असल्याने मोठ्या अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही मार्गावर दोन वेळा लाखो रुपये खर्च करून खड्डे भरण्यात आले आहेत. परंतु ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने खड्डे भरत असल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले असल्याचे चित्र आहे.

 

कर्जत -कल्याण हा महत्वाचा राज्यमार्ग आणि नेरळ कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग समजला जातो या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये- जा सुरू असते. त्यामुळे या रस्त्याचा दर्जा साहजिकच चांगला असणे आवश्यक आहे. परंतु असे कधी होताना दिसत नाही. या रस्त्यावर पावसाळ्यात दरवर्षी खड्यांचे साम्राज्य पसरते आणि त्याचा त्रास स्थानिक नागरिक प्रवासी आणि वाहन चालकांना सहन करावा लागतो. यावर्षीही रस्त्यावर पावसाळ्यात दोन वेळा खड्डे भरण्याचे काम केले आहे. परंतु ठेकेदार मात्र अर्धे खड्डे मात्र भरतच नाहीत, असेच रस्त्यावर चित्र दिसत आहे. जे खड्डे भरले जातात त्यावर रोलर न फिरवता काम केले जात असल्याने पुन्हा दोन दिवसात खड्डे जैसे थेच होत असतात. ठेकेदार मात्र वेळ मारून नेण्याचे काम करत असतात. असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
असे असताना देखील बांधकाम विभागाचे अधिकारी अशा ठेकेदारांवर कारवाई करत नाही, खरी गरज आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मात्र तसे होताना दिसत नाही. शासनाच्या पैशाचा गैरवापर होत असताना अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प का आहेत, हा प्रश्न कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतावत आहे. दोन वेळा खड्डे भरूनही खड्ड्यांची अवस्था अशी असेल तर खड्डे भरून त्याचा काय उपयोग असा प्रश्न प्रवासी व स्थानिक नागरिकांना पडला आहे. 
      त्यामुळे या महत्वाच्या रस्त्यावर चांगल्या दर्जाचे खड्डे भरावेत अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. गणेशोत्सव जवळ येत असल्याने रस्ते चांगल्या दर्जाचे होणे आवश्यक आहे. अशाच निकृष्टप्रकारे खड्डे जर भरले तर श्री गणेशाचे आगमन खाड्यांतून झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे अधिकारी, ठेकेदारांना चांगली बुद्धी दे रे देवा अशीच मागणी सद्या कर्जत तालुक्यातील नागरिक आणि प्रवासी,वाहन चालक करत आहेत. 
 
कर्जत- कल्याण आणि नेरळ कळंब रस्त्यावर काही खड्डे भरले आहेत तर काही खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत. ठेकेदार चुकीच्या पद्धतीने खड्डे भरत असून वेळ मारून नेण्याची कामे करत आहेत. अधिकाऱ्यांनाही ठेकेदार ऐकत नाहीत, अशा ठेकेदारांवर राजकीय वरदहस्त असल्यानेच ठेकेदारांची मनमानी सुरू आहे, आणि त्यामुळेच शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. आणि त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.
– भरत भगत, सामाजिक कार्यकर्ते
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत