धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून घर पेटविण्याचा प्रयत्न

ठाणे : रायगड माझा वृत्त

एका माथेफिरू तरूणाने ठाण्याच्या खारटन रोड परिसरातील एका घरात रॉकेलचे पेटते बोळे टाकून घर पेटविण्याचा प्रयत्न सोमवारी मध्यरात्री केला. त्यावेळी घरात चार लहान मुलांसह नऊजण होते. ते वेळीच घराबाहेर धावल्याने बचावले. रॉलेकचा बोळा गॅसच्या शेगडीवर पडला होता. तिथून काही अंतरावर सिलिंडर होता. त्याचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून आरोपी रितेश धरमवीर महरोल (२७) याला पोलिसांनी अटक केली आहे.


रितेश आणि ज्योती (नाव बदललेले आहे.) एकमेकांचे परिचित असून फेसबुकवरही ते एकमेकांच्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत. ज्योतीचे लग्न दुसऱ्या एका तरुणासोबत ठरले असून डिसेंबर महिन्यात ते विवाहबद्ध होणार आहेत. मात्र, रितेशने ज्योतीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. त्यानंतर ज्योतीने रितेशशी बोलणे बंद केले होते. अवस्थ झालेल्या रितेशने ज्योतीसोबतचा फोटो आपल्या व्हॉटसअॅप डीपीवर ठेवला होता. रितेशच्या या माथेफिरू प्रकारांमुळे आपल्या मुलीचे लग्न मोडेल, अशी भीती कुटुंबाला वाटत होती. त्यामुळे त्यांनी रितेशची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर रितेशने या ज्योतीच्या कुटुंबाला धमकी दिली होती. सोमवारी रात्री ज्योती आपल्या कुटुंबासह खारटन रोड येथील मामाच्या घरीच वास्तव्याला होती. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास रितेशने घरात रॉकेलचे पेटलेले बोळे फेकल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. सुमारे दहा बाय बाराच्या खोलीत ९ जण झोपले होते. रॉकेलचा पेटता बोळा गॅस शेगडीवर पडल्यानंतर घरात धूर झाला. त्यामुळे घाबरून उठलेल्या ९ जणांनी घराबाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. रितेशशी भांडण झाल्यानंतर त्याने हा प्रकार केल्याची तक्रार ज्योतीच्या मामाने पोलिसांकडे नोंदवल्यानंतर पोलिसांनी चौकशीअंती रितेशला अटक केली आहे. रितेश हा ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे.

रितेशच्या माथेफिरूपणामुळे ज्योतीचे यापूर्वी दोन वेळा ठरलेले लग्न मोडल्याची माहिती तिच्या मामाने दिली. तर, रितेश याचे यापूर्वी दोन वेळा लग्न झाल्याचे समजते. तसेच, २०१५ साली त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत वर्तकनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. तर, माझ्या मुलाला या प्रकरणात नाहक फसवले असल्याचे रितेशच्या वडील धरमवीर मेहरोल यांचे म्हणणे आहे.

बहिणीने वाचवला भावाचा जीव

ज्योतीच्या मामाला तीन मुली आणि एक तीन वर्षांचा मुलगा आहे. आरोपीने घरात पेटता बोळा फेकल्यानंतर घरातील सर्वजण बाहेर पळाले. ज्याठिकाणी बोळा पडला तेथे किचन असल्याने तत्काळ घरातील सिलिंडर बाहेर काढले. मात्र मुलगा घरातच असल्याचे समजल्यानंतर मुलाच्या मोठ्या ११ वर्षाच्या बहिणीने भावाला वाचवण्यासाठी धाव घेत घरातून सुखरूप बाहेर काढले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत