धक्कादायक! केमिकल आणि पाण्यापासून तयार करत होते रक्त; 7 जणांना अटक

लखनऊ : रायगड माझा वृत्त 

Related image

केमिकल आणि पाण्यापासून रक्त तयार करणाऱ्या सात जणांचं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे. उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये रक्ताचा हा काळा व्यवसाय सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी आता सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.मडियाव इथल्या दोन रुग्णालयांत छापा टाकून गुरूवारी पोलिसांनी बनावट रक्ताचे आठ युनिट ताब्यात घेतले आहेत. ब्लड बँकेची कागदपत्रं आणि कर्मचाऱ्यांबाबत आता यूपी पोलीस अधिक तपास करत आहेत.

स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अत्यंत गोपनीय पद्धतीने हा छापा मारला. एसटीएफने तब्बल 15 दिवस ब्लड बँकेची पाहणी केली. सर्व पुरावे आणि साक्षीदार जमा केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, या छापेमारीबाबत स्थानिक पोलिसांनाही काहीच कल्पना देण्यात आली नव्हती.एसटीएफच्या म्हणण्यानुसार, आरोपी केमिकल आणि पाणी मिसळून दोन ते तीन युनिट रक्त तयार करत. तसंच तिथं वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेले कर्मचारी काम करत होते. ब्लड बँकेसाठी कोणताही डॉक्टर ठेवण्यात आला नव्हता. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या अमानुषांना पोलिसांनी आता अटक केली आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी फक्त शालेय शिक्षण घेतलेलं आहे. हे आरोपी कामगार आणि रिक्षाचालकांकडून 1000 ते 1200 रूपयांत एक युनिट रक्त खरेदी करत आणि त्यात केमिकल आणि पाणी मिसळत. या भेसळयुक्त रक्ताचे ते तब्बल 3500 रूपये वसूल करत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत