धक्कादायक; कोल्हापूर येथे बंदुकीसह शस्त्रसाठा जप्त

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त

गोळीबारात जखमी काळबा ऊर्फ विजय गायकवाडच्या घरात काडतुसाचे (राऊंड) पाच बॉक्‍स, तलवार, चाकू, गुप्ती असा शस्त्रास्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला. त्याचे संदर्भ असलेल्या शहर परिसरातील दहा ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. रात्री उशिरा एका बंदुकीसह इतर शस्त्रे जप्त केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

रुईकर कॉलनी येथील तारा ऑईल मिल्सच्या कंपाऊंडला लागूनच छोटी वसाहत आहे. कच्ची घरे आहेत. गल्ली-बोळ आहेत. याच बोळातील एका कोपऱ्यावर काळबाची सासरवाडी आहे. या गल्लीत तणावपूर्ण वातावरण नव्हते. रात्री आठच्या सुमारास गल्लीतील नागरिक टीव्ही पाहत बसले होते. लहान मुले सायकल फिरवत होती. कोपऱ्यावरील काळबाच्या सासरवाडीच्या घरापासून पुढे पोलिसांनी कोणालाही जाऊ दिले नव्हते. तेथे पोलिसांच्या गाड्या थांबून होत्या.

रात्री आठच्या सुमारास पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे थांबून होते. पोलिसांनी घेतलेल्या घर झडतीत राऊंडचे (गोळ्याचे) पाच बॉक्‍स मिळून आले आहेत. पोलिसांनी पांढऱ्या रुमालात बांधून जप्त केले. याच वेळी सासरवाडीत तलवार, गुप्ती, चाकू मिळाला. तेही जप्त करण्यात आले. पोलिसांच्या तीन पथकांनी शहर आणि परिसरात दहा ठिकाणे छापे टाकून बंदुकीसह इतर शस्त्रे जप्त केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुंगळी सापडली
घटनास्थळावर पोलिस अधिकाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना एक पुंगळी सापडली आहे. बॉम्ब शोध पथकानेही त्या घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी बारकाईने काळबाच्या सासरवाडीच्या घरासमोर शोध घेतल्यानंतर रात्री ही पुंगळी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

काडतुसाच्या पाकिटावर ‘काळू’
जप्त केलेल्या काडतुसाच्या पाच पाकिटांवर काळू असे काळ्या शाईने लिहिलेले आहे. अक्षरे पुसली जाणार नाहीत, याची काळजी घेतलेली दिसते, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

यांनी दाखविले धाडस..
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र सानप, दादासाहेब पवार, कॉन्स्टेबल श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, किरण गावडे, उत्तम सडोलीकर, अमोल कोळेकर आदींनी जीवाची पर्वा न करता ही कारवाई केली. काळबाच्या हातातून रिव्हॉल्व्हर काढून घेताना कारंडेही किरकोळ जखमी झाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत