धक्कादायक; घराच्या अंगणात पत्नीने जाळला पतीचा मृतदेह

येरवडा : रायगड माझा वृत्त 

जेवण भरविण्यास नकार दिल्यामुळे वडिलांनी मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मुलीने वडिलांना ढकलल्यामुळे त्यांचे डोके भिंतीवर आदळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मयत व्यक्तीच्या पत्नीने मुलीला वाचविण्यासाठी पतीचा मृतदेह अंगणात जाळून ती राख घरामागील सेफ्टी टँकमध्ये टाकली आणि पुरवा नष्ट केला. ही घटना लोहगाव येथील वडगाव शिंदे गावात मंगळवारी रात्री घडला.

नीलेश भीमाजी कांबळे (वय ३५, रा. वडगाव शिंदे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांकडून बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लोणीकंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगावच्या पुढे वडगाव शिंदे गावात कांबळे कुटुंबीय राहण्यास आहेत. नीलेशला दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. संसार चालविण्यासाठी त्यांची पत्नी विद्या घरकाम करत होती. त्यांना पंधरा वर्षांची मुलगी आणि अकरा वर्षांचा मुलगा आहे. मंगळवारी सायंकाळी मुले शाळेतून घरी आल्यानंतर नीलेश यांनी मुलीला जेवण देण्यास सांगितले. मुलीने जेवण वाढून दिल्यानंतर नीलेश यांनी तिला जेवण भरविण्यास सांगितले. मात्र, हातााल जखम झालेली असल्याने मुलीने जेवण भरविण्यास नकार दिला. त्यामुळे नीलेश यांना राग आला आणि ते मुलीच्या अंगावर धावून गेले. त्या वेळी मुलीने त्यांना जोराने ढकलून दिले आणि घराला कडी लावून ती बाहेर निघून गेली. मुलीने ढकलून दिल्याने नीलेश भिंतीवर जोरात आपटले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळाने नीलेश यांची पत्नी घरकाम करून आली. त्या वेळी तिला नीलेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांचा मृत्यू झाल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत चौकशी केली असता, त्यांच्या मुलीने वडिलांना ढकलून दिल्याचे त्यांना समजले. त्यामुळे घाबरलेल्या पत्नीने मुलीला वाचविण्यासाठी पतीचा मृतदेह चादरीत गुंडाळून ओढत घराच्या अंगणात नेला. रात्री उशिरा लाकडे आणि ज्वलनशील इंधनाने पतीचा मृतदेह अंगणातच जाळून टाकला. बुधवारी पहाटे मृतदेह जळाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची राख घराच्या सेफ्टी टँकमध्ये टाकून दिली. बुधवारी सकाळी अंगणात काही प्रमाणात राख दिसल्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चालू केला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस बुधवारी सकाळपासून कांबळे कुटुंबाची चौकशी करीत होते. त्यांनी सेफ्टी टँकचीही पाहणी केली असून, त्यात राख सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत