धक्कादायक : जातीबाहेर लग्न केलं म्हणून मुलीला सात वर्ष डांबून ठेवलं

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

जातीबाहेर लग्न केलं म्हणून मुलीचा जबरदस्ती घटस्फोट घडवून आणत तिच्या निर्दयी मातापित्याने तिला सात वर्ष खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. आई वडिलांचा डोळा चुकवून या महिलेने तिची परिस्थिती तिच्या पतीला सांगितल्यानंतर पतीने दिल्लीच्या महिला आयोगाची मदत घेत तिची सुटका केली आहे. तब्बल सात वर्षानंतर एकमेकांसमोर आलेल्या या नवरा बायकोच्या भावनांचा बांध तुटला व त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकाच कॉलेजमध्ये शिकत असलेल्या या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी २०११ साली पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनी मुलीच्या वडिलांनी तिला फोन करून आईला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरून मुलगी तत्काळ घरी परतली. मात्र तिथे गेल्यावर तिच्या आईला काहीही झाले नसल्याचे तिला समजले. त्यानंतर ती परत पतीकडे जाणार इतक्यात तिच्या आई वडिलांनी तिला पतीला व त्याच्या घरच्यांनी हत्या करू अशी धमकी दिली व तिला जबरदस्ती नवऱ्याला घटस्फोट द्यायला लावला.

त्यानंतरही त्यांनी तिला घरातील एका खोलीत डांबून ठेवलं. गेल्या महिन्यात मुलगी आई वडिलांची नजर चुकवून घरातून पळून गेली. मात्र तिच्या पालकांनी तिला पकडून घरी आणली. मात्र या दरम्यान तिने तिच्या माजी पतीला फोन करून तिची अवस्था सांगितली. त्यानंतर पतीने महिला आयोगाची व पोलिसांची मदत घेत तिची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत