धक्कादायक; डॉक्टरच्या उपस्थितीत चौथी पास शिपायाने घातले टाके

रुग्णाच्या नातेवाईकाने हा धक्कादायक व्हिडीओ शूट केला असून यामध्ये शिपाई हाताला टाके देत असल्याचं दिसत आहे

रायगड  माझा वृत्त

हरियाणामधील रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चक्क रुग्णालयातील शिपाई रुग्णाला टाके घालताना दिसत आहे. रुग्णाच्या नातेवाईकाने हा व्हिडीओ शूट केला असून यामध्ये शिपाई हाताला टाके घालत असल्याचं दिसत आहे. रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा प्रकार सुरु होता तेव्हा डॉक्टर तिथेच उपस्थित होते, मात्र त्यांनी थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी घडली आहे.

रुग्णाने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, एकदा तपासणी केल्यानंतर डॉक्टर पुन्हा आलेच नाहीत. ‘माझ्या हातातून सतत रक्त वाहत होतं पण मला कोणतंही पेनकिलर देण्यात आलं नाही. चौथी शिकलेला शिपाई आला आणि त्याने माझ्या हाताला टाके घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी डॉक्टर तिथेच बाजूला बसले होते’.

‘टाके किती चांगल्या पद्धतीने घालण्यात आले याबाबत मला खात्री नाही, मात्र अद्यापही तिथे वेदना होत आहेत. जेव्हा मी दुसऱ्या एका डॉक्टरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी टाके योग्य पद्धतीने घातले नसल्याचं सांगत माझी मलमपट्टी केली’, अशी माहिती रुग्णाने दिली आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी एमबीबीएसच्या जागा दुपटीने वाढवत असल्याचं सांगितलं आहे. तसंच जेव्हा कधी अशा घटना समोर येतात तेव्हा तात्काळ कारवाई केली जाते असंही त्यांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत