धक्कादायक; तब्बल चार दिवसांनी नकुलचा मृतदेह सापडला

कुडाळ : रायगड माझा वृत्त

मेढा येथील फार्मसी कॉलेजच्या युवकाने वेण्णा नदीच्या पुलावरून 4 दिवसांपूर्वी उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने खळबळ उडाली होती. यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र तो खोल पाण्यात बुडाल्याने त्याचा शोध गेल्या चार दिवसांपासून सुरूच होता. गेल्या चार दिवसांपासून त्याला महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स, पोलिस, स्थानिक ग्रामस्थ यांच्या माध्यमातून शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू होती. अखेर आज मंगळवारी सकाळी नकुलचा मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगत असताना शोध पथकाला दिसला.

चार दिवसांपासून डोळ्यात तेल घालून महाबळेश्वर ट्रेकर्सचे सर्व सोल्जर मिळणा येथील वेंना नदीच्या चारी बाजूने शोध घेत होते. नदीचा असा एकही कोपरा महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सोल्जरने शोधण्यासाठी शिल्लक ठेवला नव्हता, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत नदीचा सर्व परिसर महाबळेश्वर ट्रेकर्ससह मेढा पोलिस, शिवेंद्रराजे ट्रेकर्स, स्थानिक ग्रामस्थ यांनी शोधून काढला होता. सर्वांचे प्रयत्न सुरूच होते, मात्र आज सकाळी नकुलचा मृतदेह पुलाखाली तरंगत असताना दिसून आला. ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांच्या साह्याने तरंगत असलेल्या मृतदेह रबर बोटीतून बाहेर काढण्यात आला. ही माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी वेण्णा  नदीच्या काठी मोठी गर्दी केली होती. गेल्या चार दिवसापासून नकुलचे नातेवाईक आई – वडील नदीकाठी नकुलचा मृतदेह कधी दिसून येतो याकडे अश्रु नयनांनी वाट पाहत होते. नकुलचा मृतदेह पाण्यातुन बाहेर काढताच मुलाला पाहुन आईने हंबरडा फोडला यावेळी आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. चार दिवसांपासून नकुलचा मृतदेह पाण्यामध्ये असल्याने त्याचे शरीर फुगले होते. चेहऱ्यावर काही जखमाही झाल्याचे दिसून आले. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत