धक्कादायक : नागपूरात बारा तासांत दोन युवकांचा खून

नागपूर : रायगड माझा वृत्त 

परीसरातील वर्चस्वावरून वाद झाल्याने हुडकेश्‍वर आणि पाचपावलीत दोन युवकाचा खून झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. अमित रामटेके (हुडकेश्‍वर) आणि अरमान अन्सारी (पाचपावली) अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत. या दोन्ही हत्याकांडानंतर पुन्हा एकदा उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहिल्या घटनेत, अमित रतन रामटेके (वय 27, रा. विनकर वसाहत, मानेवाडा) हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर आतापर्यंत तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने 2014 मध्ये मित्राचाच खून केला होता तर 2017ला वर्चस्वातून एकावर तलवारीने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. परिसरात दहशत पसरविणे तसेच गुंडगिरी करीत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला अनेक जण कंटाळले होते. शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास अमित हा हुडकेश्‍वरातील परीवर्तन चौक, बेसा इंडियन बॅंकेजवळ उभा होता. यावेळी अज्ञात तीन ते चार आरोपींनी त्याला गाठले. जुन्या वादावरून त्याच्याशी भांडण केले. त्यानंतर अमितला मारहाण केल्यानंतर त्याच्या डोक्‍यात सिमेंटच्या विटा घातल्या. अमितच्या पोटात चाकू व तलवार खूपसून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी भाऊ गौरव रामटेके याच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. अद्याप आरोपींचा सुगावा लागला नाही. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत, पाचपावलीतील अरमान अन्सारी (वय 25, रा. म्हाडा कॉलनी, जरीपटका) याचा शेजाऱ्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादातून तिघांनी अरमानचा लोखांडी रॉडने वार करून खून केला. अरमान अन्सारी हा खासगी काम करीत होता. त्याच्या घराशेजारी आरोपी नसीम शेख हे राहत होते. वाहनांच्या पार्किंगवरून अरमान आणि नसीम यांच्यात नेहमी वाद होत होते. हाणामारी आणि शिवीगाळ झाल्यानंतर अनेकदा जरीपटका पोलिसांत तक्रारीसुद्धा नोंदविल्या गेल्या आहेत. मात्र, वाद मिटत नव्हता. शेख कुटूंबाचे चिकन सेंटर आहे. अरमान हा नेहमीच वाद करीत असल्यामुळे आरोपींनी कंटाळून एनआयटी क्‍वॉर्टर, राणी दुर्गावती चौकात घर घेतले. शनिवारी पुन्हा वाहनाच्या पार्किंगवरून वाद झाला. त्यामुळे नेहमीची कटकट मिटविण्याच्या उद्‌देशाने आरोपी नसीम शेख, जुबेर शेख आणि वसीम शेख यांनी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पाचपावलीतील टेका नाका-नवी वस्ती परिसरात लोखंडी रॉड, दंड्याने वार करून खून केला. या प्रकरणी शकीला अन्सारी यांच्या तक्रारीवरून तीनही आरोपीविरूद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत