धक्कादायक! पोलिसाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

महाराष्ट्र News 24

शासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेत पोलिसाने आत्महत्या केली. गुरूवारी वसई- नालासोपारा पुर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी आत्महत्या केली. सकाळी तुळींजच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात ही घटना घडली. भोये यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलीस हवालदार सखाराम भोये (३५) मागील चार वर्षांपासून तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी रात्री ते रात्रपाळीसाठी कामावर आले होते. गुरूवारी सकाळी ९ च्या सुमारास भोये यांचा मृतदेह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात आढळून आला. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाले. ही घटना सकाळी ८ ते ९च्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस हवालदार भोये यांनी ज्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली, ते शासकीय पिस्तुल आहे. आपत्कालीन परिस्थितीत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ते वापरता येते, असे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी सांगितले. भोये यांनी आत्महत्येपूर्वी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती. कामाच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चौकशीनंतर भोये यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. मयत सखाराम भोये पत्नी आणि मुलासह नालासोपारा पुर्वेच्या प्रगतीनगर येथे रहात होते. २००३मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत