धक्कादायक! मुंबईतील ७८ टक्के दूध निकृष्ट

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

 

दूध हा आपल्या आहारातील मुख्य घटक. दूधात अनेक प्रकारची सत्व असतात, जी आपल्या शरीराला आवश्यक असतात. त्यामुळे दूध हे चांगल्या प्रतीचं असावे, त्याचा दर्जा चांगला असावा, असं सर्व ग्राहकांना वाटत असतं. किंबहुना चांगलं दूध मिळण्यासाठी ग्राहक धडपडत असतो. मात्र, नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात मुंबईमधील ७८ टक्के दूधाचा दर्जा निकृष्ट असल्याचं समोर आलं आहे.

भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेनं याबाबतचं निरीक्षण नोंदवलं आहे. या संस्थेनं मुंबईत विक्री होणाऱ्या दूधाचे सुमारे ६९० नमुने प्रयोगशाळेत तपासले. गेल्या १० महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होती. विविध प्रकारच्या तपासण्यांमध्ये त्यात केवळ २१.८८ टक्के नमुने पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकृष्ठ दर्जाच्या दूध विक्रीत ८ टक्के वाढ झाल्याचं समोर आलं असून, अन्न व औषध प्रशासन आणि राज्य सरकारने याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

या अभ्यासात २२८ ब्रॅण्डेड, ४६२ सुट्या पद्धतीनं विकल्या जाणाऱ्या दुधाचे नमुने घेण्यात आले. भारतीय मानक व खाद्य सुरक्षा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या निकषांवर केवळ १५१ टक्के नमुने पात्र ठरले. यामध्ये ब्रॅण्डेड कंपन्यांच्या पात्र ठरलेल्या नमुन्याचे प्रमाण फक्त २०.६१ टक्के आहे. तर सुट्या पद्धतीने विक्री होणाऱ्या दुधाचे प्रमाण २२.५१ टक्के आहे.

ग्राहकांनी आपण विकत घेत असलेल्या दुधाच्या दर्जाबाबत जागृत असलं पाहिजे. तसंच अशा प्रकारच्या विक्रीविरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचं भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सीताराम दीक्षित यांनी सांगितलं.
ग्राहक मार्गदर्शन संस्थेने आपला अहवाल प्रशासनाला सादर करावा. अशा प्रकारच्या भेसळयुक्त दूध विक्रीवर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं.

दरम्यान, या संस्थेनं २००८ मध्येदेखील मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि अन्य जिल्ह्यातील विक्री करण्यात आलेल्या दुधाचे नमुने घेऊन तपासणी केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत