धक्कादायक : विद्यार्थ्यांनी लुटले दारूचे बॉक्‍स

वैभववाडी : रायगड माझा वृत्त 

ट्रकचालकाला धक्काबुक्की करून दारूचे सहा बॉक्‍स लुटण्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. ट्रकचालकाने हे प्रकरण पोलिसांत नेले; परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता संबंधितांना अभय दिले. ही लूट करणारे दुसरेतिसरे कुणीही नसून शहरापासून जवळच असलेल्या महाविद्यालयातील काही विद्यार्थी असल्याची चर्चा शहरात आहे.

दारूची अधिकृत वाहतूक करणाऱ्या ट्रकचे टायर एडगाव येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंक्‍चर झाले. त्यामुळे चालकाने ट्रक थांबविला. क्‍लीनर आणि त्याने टायर बदलणे सुरू केले. एवढ्यात सहा ते सात जणांचे टोळके तेथे आले.

ट्रकचालकाला ‘तू आम्हाला हूल दिली,’ असे म्हणत त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. अचानक धक्काबुक्की सुरू झाल्यामुळे ट्रकचालक भांबावून गेला. मारहाण करत असतानाच टोळक्‍यातील काहींनी ट्रकमधील दारूचे बॉक्‍स काढण्यास सुरवात केली. क्‍लीनरने त्यांतील काहींना अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यालाही त्यांनी बाजूला केले आणि ट्रकमधील सहा बॉक्‍स घेत तेथून पलायन केले.

या प्रकारानंतर अवघ्या काही मिनिटांत ट्रकचा क्‍लीनर पोलिस स्थानकात आला. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीही त्या टोळक्‍याला तातडीने पोलिस स्थानकात आणले; मात्र त्या टोळक्‍यापाठोपाठ काही स्थानिक पदाधिकारी हे प्रकरण मिटविण्यासाठी हजर झाले. त्यांनी पोलिसांना तटस्थ भूमिकेत राहण्याची विनंती करत ट्रकचालक आणि क्‍लीनरवर दबाव टाकत प्रकरण मिटविण्यास सांगितले. हा सर्व प्रकार सुरू असल्यामुळे ट्रकचालक आणि क्‍लीनर हे दोघेही चक्रावून गेले. त्यानंतर हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले. या प्रकरणाची चर्चा सध्या तालुक्‍यात सुरू आहे. लुटारूंवर कारवाई होत नसेल, तर पोलिस कारवाई करणार कुणावर, असा प्रश्‍न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्या सहा-सात विद्यार्थ्यांना पोलिस स्थानकात आणले होते. त्यांच्याविरुद्ध ट्रकचालक किंवा क्‍लीनरने तक्रार न दिल्यामुळे कारवाई केलेली नाही.
– दत्तात्रय बाकारे, 

सहायक पोलिस निरीक्षक, वैभववाडी

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत