धक्कादायक; ७ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

पुणे: रायगड माझा वृत्त

दापोडी येथील मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या (सीएमई) कर्मचारी वसाहतीत सात वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपीनेही नंतर सीएमईच्या कम्पाउंडच्या तारेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीची आई आणि आत्महत्या केलेल्या तरुणाचे प्रेमसंबंध होते, असं सांगण्यात येतंय. आरोपी तरुणाची ओळख पटली असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा राहणारा आहे. विजय बहादूर यादव (वय २५) असं त्याचं नाव आहे.

मृत मुलीची आई सीएमईमध्ये सफाई कर्मचारी आहे. तर आरोपी विजय यादव त्याच कॉलेजच्या कॅन्टीनमध्येच वेटरचं काम करत होता. सहा-सात महिन्यांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांचं गंभीर आजारानं निधन झालं. ते ड्रायव्हर होते. त्यांच्या निधनांतर मुलीच्या आईचे आणि विजयमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही लोकांनी त्यांना एकत्र पाहिलंही होतं. लग्नासाठी तो महिलेच्या मागे लागला होता. पण वयात मोठं अंतर असल्यानं त्या महिलेनं त्याला नकार दिला. त्यावरून काल दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. संतापलेल्या विजयनं तिला धमकीही दिली होती.

सकाळी मुलीची आई नेहमीप्रमाणे कॅन्टीनमध्ये कामासाठी गेली. त्यानंतर मोठी बहीणही शाळेत गेली. त्यामुळे सात वर्षांची मुलगी घरात एकटीच होती. यावेळी आरोपी विजय यादव आला आणि त्याने बलात्कार करून तिची हत्या केली. हत्या करून त्याने घरातच खिडकीला इस्त्रीच्या वायरने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न फसल्यानं तो तिथून निघून गेला. मात्र जाताना मृत मुलीच्या मोठ्या बहिणीने त्याला पाहिलं. ती घरात आल्यानंतर बलात्कार आणि हत्येची घटना उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या आईकडे विचारपूस केल्यावर त्यांनी विजयवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी विजयच्या शोधासाठी पथकं पाठवली. तसंच, सीएमईच्या परिसरातील दाट जंगल पिंजून काढलं. यावेळी कम्पाउंडच्या काटेरी तारेने गळफास घेतलेला विजय यादव मृतावस्थेत पोलिसांना आढळून आला.

मुलीच्या मृत्यूने तिच्या आईला धक्का बसला आहे. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. आरोपी विजय यादव हा लग्नासाठी तिच्या मागे लागला होता. ही गोष्ट तिने आपल्या नात्यातील काही जणांना सांगितली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत