धक्कादायक : 8 वर्षात 33 जणांची निर्घृण हत्या

मी 33 जणांना मुक्ती दिली, असं त्यांना हसत हसत पोलिसांना सांगितलं

भोपाळ : रायगड माझा वृत्त

गेल्या 8 वर्षात 33 जणांची हत्या करणाऱ्या टोळीला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीनं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओदिशात 33 जणांचे खून केले. ट्रक चालक आणि क्लिनर्सचे खून करुन ट्रकमधील मालाची विक्री करायची, अशी या टोळीची मोडस ऑपरेन्डी होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी या टोळीची चौकशी सुरू केली. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून अनेक हत्या प्रकरणांचं गूढ उलगडलं आहे.

मध्य प्रदेशच्या मंडीदिप भागात टेलरिंगचं काम करणारा आदेश खामरा या टोळीचा म्होरक्या होता. 2010 साली त्यानं अमरावतीमध्ये पहिला खून केला. त्यानंतर दुसरी हत्या नाशिकमध्ये केली. यानंतर हत्यांचं सत्र सुरू झालं. यानंतर खामरा आणि त्याच्या टोळीनं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अनेकांचे खून केले. ट्रक चालक आणि क्लिनर्सची हत्या करुन त्यांची ओळख पटेल, असे पुरावे नष्ट करायचे आणि मग त्यांचे मृतदेह निर्जन स्थळी गाडून टाकायचे, अशा पद्धतीनं ही टोळी काम करायची. मात्र तरीही काही मृतदेह आढळून आले आणि पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांकडून या हत्यांचा तपास सुरू असताना गेल्या आठवड्यात आदेश खामराला अटक करण्यात आली. त्यानं तब्बल 30 हत्यांची कबुली दिल्यानं पोलीस चक्रावून गेले. यानंतर त्यानं काल आणखी तीन खुनांची माहिती पोलिसांना दिली. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरच्या जंगलातून खामराला ताब्यात घेण्यात आलं. यानंतर त्यानं एका पाठोपाठ एक खुनांची कबुली दिली. यामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये शेजारच्या राज्यांमध्ये झालेल्या खुनांचा उलगडा होऊ लागला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत तायक्वांदोत कांस्य पदक पटकावणाऱ्या आणि सध्या पोलीस अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या बिट्टू शर्मा यांनी मोठ्या हिमतीनं खामराला अटक केली. विशेष म्हणजे खामराला ताब्यात घेताना शर्मा यांना त्यांची पार्श्वभूमी इतकी गंभीर असेल, याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. इतक्या जणांना संपवण्याचं कारण काय, असा प्रश्न पोलिसांनी चौकशीदरम्यान खामराला विचारला. त्यावर ती सर्व माणसं अतिशय हलाखीत जगत होती. त्यामुळे मी त्यांना मुक्ती दिली, असं उत्तर खामरानं हसत हसत पोलिसांना दिलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत