‘धर्मरक्षणासाठी केली हत्या’

बेंगळुरू: रायगड माझा 

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याधर्म रक्षणासाठीच केली. त्या कोण होत्या हे मला माहीत नव्हतं, अशी कबुली लंकेश यांचा मारेकरी परशुराम वाघमारे याने दिली असल्याचं पुढे येत आहे.

परशुराम वाघमारेने ५ सप्टेंबर २०१७ रोजी बेंगळुरूच्या आरआर नगर येथील गौरी लंकेश यांच्या घरासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कुणाला मारतोय हे त्याला माहित नव्हतं, असं त्यानं म्हंटलं आहे. धर्म रक्षणासाठी एक खून करायचा आहे, असं मला २०१७ मध्ये सांगण्यात आलं होतं. मी त्यासाठी तयार झालो. त्या कोण होत्या हे मला माहीत नव्हतं. पण त्यांना मारायला नको होतं, असं आता मला वाटतंय, अशी कबुली वाघमारेने दिली आहे.

वाघमारेला ३ सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथे नेण्यात आलं होतं. बेळगावमध्ये त्याला बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. ‘लंकेश यांच्या हत्येपूर्वी मला एका घरात नेण्यात आले. तिथून बाइकवर बसून एका माणसाने मला लंकेश यांचं घर दाखवलं. दुसऱ्या दिवशी मला दुसऱ्या रूममध्ये नेण्यात आलं. तिथून पुन्हा आम्ही लंकेश यांच्या घरी गेलो. त्याच दिवशी मला गौरी लंकेश यांची हत्या करण्यास सांगण्यात आलं होतं. पण आम्ही पोहोचलो तेव्हा त्या घरात गेल्या होत्या,’ असंही वाघमारेने एसआयटीसमोर स्पष्ट केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत