मुंबई : रायगड माझा वृत्त
वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होणारं धोकादायक ‘किकी चॅलेंज’ आता थेट मुंबईच्या लोकलमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावर धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज पूर्ण करताना तरुणाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पण लोकलमध्ये केलेलं हे किकी चॅलेंज संबंधित तरुणाला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे, कारण मध्य रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.
सीएसएमटी स्थानकावरुन लोकल सुरू झाल्यानंतर संबंधित तरुण लोकलमधून उतरतो आणि प्लॅटफॉर्मवर डान्स करायला लागतो, त्यानंतर पुन्हा तो धावत्या लोकलमध्ये चढतो आणि डान्स परत सुरू करतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने तरुणाचा शोध सुरु केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याचा परिणाम इतरांवर होऊ शकतो, आणि इतरही मुलं जीव धोक्यात घालून लोकलमध्ये असा प्रकार करु शकतात, त्यामुळे असे प्रकार वेळीच थांबवणं गरजेचं आहे असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. तरुणाचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
यापूर्वी मुंबई पोलिसांनी, किकी तुमच्यावर प्रेम करते की नाही हे माहित नाही पण तुमचे आई- वडिल नक्कीच तुमच्यावर खूप प्रेम करतात. तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. तुमची काळजी घ्यायला आम्हाला आवडतं कोणा एका किकीमुळे तुमची सुरक्षा धोक्यात आलेली आम्हाला आवडणार नाही, आता किकीला सुद्धा तुमच्या चॅलेंजचा कंटाळा आलाय. अशा फुटकळ चॅलेंजसाठी जीव धोक्यात न घालता स्वत:च्या सुरक्षेचा आधी विचार करावा अशी कळकळीची विनंती मुंबई पोलिसांनी केली होती.
This Kiki is going viral. Youths have craze to post this on thier Social media account. This guy has taken this to local train #kikichallenge #challenge @News18India @googlenews @abpnewstv @BBCHindi @NavbharatTimes @abpnewshindi @IndiaToday @aajtak @DainikBhaskar @JagranNews pic.twitter.com/8yFleDLtuT
— abdul kadar (@ShasifAbdul) July 31, 2018
किकी चॅलेंज म्हणजे काय?-
सध्या ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर या कीकी चॅलेंजने धुमाकूळ घालता आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्वीकारणाऱ्याने चालू गाडीमधून खाली उतरून हळूहळू चालणाऱ्या गाडीच्या दराजवळ नाचायचे आणि काही अंतर गेल्यावर पुन्हा चालू गाडीत येऊन बसायचे. हे सगळं करताना गाडीच्या फ्रण्टसीटवरील व्यक्ती म्हणजे जी गाडी चालवत असते ती नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करते. जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर डर्कने गायलेल्या इन माय फिलींग्स गाण्यातील पहिल्या कडव्यातील चालीवर हा डान्स केला जातो. या गाण्यातील पहिल्या कडव्यातील बोल किकी डू यू लव्ह मी असे असल्याने या चॅलेंजला कीकी चॅलेंज असे नाव पडले आहे. अनेकांनी #KiKiChallenge हा हॅशटॅग वापरून या चॅलेंजचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच हे चॅलेंज काही देशांमध्ये इन माय फिलींग्स चॅलेंज नावाने ओळखले जात असल्याने या अशा धोकादायक डान्सचे व्हिडीओ #InMyFeelingsChallenge हा हॅशटॅग वापरूनही शेअर केले जात आहेत.
सुरुवात कुठून झाली-
विनोदी अभिनेता शॅगी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरून डर्कच्या इन माय फिलींग गाण्यावर ठेका धरत केलेल्या डान्सचा व्हिडीओ महिनाभरापूर्वी पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये शॅगीने गाडीचा वापर न करता केवळ एका जागी डान्स केला होता. मात्र शॅगीचा मित्र आणि अमेरिकेतील फुटबॉलपटू ओडेल बेकमह ज्युनियर याने याच गाण्यावर गाडीतून उतरून डान्स करत पुन्हा गाडीत येऊन बसल्याचा व्हिडीओ पोस्ट केला.
डर्क या चॅलेंजबद्दल काय म्हणतो-
या गाण्याचा मूळ गायक डर्क याने या चॅलेंजबद्दल कोणतेही औपचारिक वक्तव्य केले नसले तरी गाण्याला या चॅलेंजमुळे मिळणारे यश पाहता त्याने शॅगीबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अमेरिकन चार्ट लिस्टवर गाणे पहिल्या क्रमांकाला गेल्यानंतर डर्कने हा फोटो पोस्ट केला.
धोकादायक चॅलेंज-
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये तर्कबुध्दीचा अभाव दिसून येतो अशी टिका अनेकदा होते. अशाच प्रकारचे हे चॅलेंज असल्याचे जगभरातील अनेक शहरांमधील पोलिसांचे म्हणणे आहे. चालू गाडीतून उतरून गाडीच्या बाजूला नाचत राहणे जीवाला धोकादायक असल्याने अनेक शहरांमधील पोलिस खात्यांने आपल्या सोशल मिडिया हॅण्डल्सवरून तसेच पत्रके काढून जाहीर केले आहे.
पोलिस म्हणतात हा गुन्हाच-
फ्लोरिडामधील पोलिसांनी तर अशाप्रकारे चालू गाडीतून बाहेर येऊन नाचणाऱ्यांना चक्क एक हजार डॉलरचा (भारतीय मुल्यानुसार ६५ हजारहून अधिक रुपये) दंड केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तर स्पेन, अमेरिका, युएई आणि मलेशियाबरोबरच इतर काही देशांमधील महत्वाच्या शहरांमध्ये या चॅलेंजवर चक्क बंदी घालण्यात आली आहे. काही जणांना हे चॅलेंज करताना गंभीर दुखापत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.