धोरण-धरसोडीमुळे ‘मेक इन इंडिया’ संकटात

औद्योगिक क्षेत्रातून धोक्याचा इशारा; यशवंत सिन्हांकडूनही ‘घरचा आहेर’

आर्थिक धोरणांत अचानक करण्यात येत असलेले बदल आणि धरसोडीच्या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम संकटात सापडेल अशी भीती औद्योगिक क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत असतानाच, दुसरीकडे भाजपचे ‘अस्वस्थ’ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थनीतीवर जोरदार टीकाप्रहार केले. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा दावा करीत त्यांनी त्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटलींनाच जबाबदार धरले. याआधी भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनीही अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात असल्याचा इशारा देऊन जेटली यांना लक्ष्य केले होते. यामुळे देशाच्या अर्थ आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सिन्हांची टीका जिव्हारी लागलेल्या भाजपने मात्र त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला.

‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘जनरल मोटर्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीशी रेल्वेकरीता डिझेलवर चालणारी एक हजार इंजिने पुरविण्यासाठी २०१५ मध्ये २६० कोटी डॉलरचा करार केला होता. रेल्वेत १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक करण्यास परवानगी दिल्यानंतर अमेरिकी कंपनीने केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक होती. परंतु गेल्याच आठवडय़ात रेल्वे मंत्रालयाने, आम्हांला आता डिझेल इंजिनांची गरज नसून, आता त्याऐवजी इलेक्ट्रिक इंजिने पुरवा असे जनरल मोटर्सला कळविले. ही कंपनी डिझेल इंजिनांसाठी कारखाना उभारत असतानाच केंद्र सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला. मोदी सरकारचे हे ‘धोरणझोके’ त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ या योजनेस महागात पडू शकतात, अशे गुंतवणूकदारांचे मत असल्याचे दिसते. ‘जनरल मोटर्सच्या या प्रकरणास प्रतिकात्मक महत्त्व आहे. कारण ते भारतातील सर्वात आधीच्या आणि निष्ठावान गुंतवणूकदारांपैकी एक आहेत,’ असे यासंदर्भात बोलताना ट्रस्टेड सोर्सेस या कंपनीचे राजकीय विश्लेषक अमिताभ दुबे यांनी म्हटल्याचे ‘रॉयटर्स’ने नमूद केले आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत