नकली ‘‘इच्छापुर्ती नागमणी’’ विकून फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण केली जेरबंद

 

अलिबाग : बी राजेश

इच्छापूर्ती नागमणी असल्याचे भासवून उच्चभ्रू व अंधश्रद्धाळू व्यक्तींना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. सुशांत नामदेव मोरे (33), मरकाम कालीदार राजपूत (35) अशी पकडलेल्या आरोपीची नावे आहेत. तर यातील दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यात इच्छापूर्ती नागमणी विकून लोकांना फसविण्याचा धंदा करणाऱ्याचे पितळ उघडे पडले आहे.


जिल्ह्यात नकली इच्छापूर्ती नागमणी विकणारी टोळी कार्यरत असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेक्षण पथकाला लागली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेक्षण पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांनी सपोनि सचिन सस्ते यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले होते.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 नोव्हेंबर 2018 रोजी दोन इसम महाड तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.17 वरील टोळ फाटा येथे ‘‘इच्छापुर्ती नागमणी’’ घेवून येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेक्षण पथक घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी सुशांत नामदेव मोरे, वय-33 वर्षे, रा.आंबेत-बौध्दवाडी, ता.म्हसळा, जि.रायगड व मरकाम कालीदार राजपूत, वय-35 वर्षे, रा.एस.टी.स्टॅंण्ड जवळील झोपडपट्टी, महाड, ता.महाड, जि.रायगड मुळ रा.परडीयातलाब, ता.सैपूरा, जि.डिंडोरी, राज्य-मध्यप्रदेश नावाचे दोन इसम भेटून त्यांचेकडे ‘‘इच्छापुर्ती नागमणी’’ असल्याचे सांगितले.
व्यवहाराच्या औपचारीक बोलणी झाल्यानंतर मोरे व राजपूत यानी त्यांचे जवळील ‘‘इच्छापुर्ती नागमणी’’ याचे महात्म्य स्पष्ट करण्याकरीता त्याचे प्रात्यक्षिके दाखविण्याकरीता मौजे सापे गावच्या जवळील रेती बंदरावर नेले. तेथे या दोघांचे अजून संजय उर्फ कोरचा राजपूत व वीर अशी दोन साथीदार हजर होते. त्यांनी मिळून पोलीस पथकास एलईडी लाईटच्या सहाय्याने ‘‘इच्छापुर्ती नागमणी’’ याची प्रात्यक्षिके दाखविण्यास सुरुवात केली. मात्र प्रात्यक्षिक करीत असताना इसमांना पोलीस पथकाचा संशय आल्याने त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलीस पथकाने सुशांत नामदेव मोरे, मरकाम कालीदार राजपूत यांना व ‘‘इच्छापुर्ती नागमणी’’ ताब्यात घेतले.
वीर व संजय अंधाराचा व झाडा-झूडपाचा फायदा घेवून पळून गेले. पकडलेल्या आरोपिकडे ‘‘इच्छापुर्ती नागमणी’’ याबाबत विचारणा केली असता तो नकली, खोटा असून प्लॅस्टीकचा असल्याचे सांगून विकत घेण्याकरीता आलेल्या लोकांना एलईडी लाईटच्या सहाय्याने प्रकाश किरणे पाडून ‘‘इच्छापुर्ती नागमणी’’ याचे महात्म्य सांगून त्यांची मोठया किमतीला विक्री करुन आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
आरोपीविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.क.420,511,34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास महाड तालुका पोलीस करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेक्षण पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, सपोनि सचिन सस्ते, पोह महेश पाटील, पोह, पांडू पाटील, पोह. सी बी पाटील, पोना प्रतीक सावंत, पोशी मोरे यांनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत