नगरसेवक श्रीपाद छिंदमला शिवजयंतीदिनी शहरबंदी

अहमदनगर : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for shreepad chindam

आज साजरी होत असलेल्या शिवजयंतीदिनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरबंदी करण्यात आली आहे. छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांतसह इतर ७० जणांवर देखील शहरबंदीची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस कायद्याचे कलम १०७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. काल (सोमवार) रात्री छिंदमसह ७० जणांना शहरबंदीची नोटीस बजावण्यात आली.

शहरात शिवजयंती साजरी होत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कोतवाली तोफखाना आणि कॅम्प पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा, कलम १०७ अंतर्गत ७० जणांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवले होते. पोलिसांच्या या प्रस्तावाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. ही शहरबंदी एका दिवसासाठीच असणार आहे.

श्रीपाद छिंदम याला नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर महानगर पालिका निवडणूक काळातही शहरबंदी करण्यात आली होती. त्यावेळी त्याला अहमदनगर शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. या निवडणुकीत श्रीपाद छिंदम हा अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर उपमहापौर असलेल्या छिंदम याला भारतीय जनता पक्षाने पक्षातून बडतर्फ केले होते. या प्रकरणी छिंदमला अटक करून त्याची रवानगी नाशिकच्या कारागृहात करण्यात आली होती. बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी बोलताना छिंदम यांने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरले होते. त्यानंतर राज्यात तणावाचे वातावरण पसरले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत