नगर रस्त्यावर मेट्रो धावणार; आजपासून मेट्रोचे काम

पुणे : रायगड माझा वृत्त

नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेसजवळील मेट्रोची अलाईनमेंट अद्याप निश्‍चित झालेली नसली तरी, रामवाडी ते फिनिक्‍स मॉल दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे कामआज पासून सुरू होणार आहे, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. मात्र, अलाईनमेंट बदलली गेल्यामुळे मेट्रोच्या खर्चातही बदल होणार आहे.

वनाज- रामवाडी मार्गावर एलिव्हेटेड पद्धतीने मेट्रो धावणार आहे. मात्र, आगाखान पॅलेस समोरून मेट्रो मार्गाला भारतीय वारसा प्राधिकरणाने हरकत घेतली आहे. त्यामुळे मेट्रोची अलाईनमेंट बदलणार आहे. वनाज ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्गाचे सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता पुढच्या टप्प्यासाठी शिवाजीनगरमधील कामगार पुतळा ते रामवाडी या साडेसात किलोमीटरच्या मेट्रो मार्गासाठी महामेट्रोने ३८८ कोटी रुपयांच्या निविदा मंजूर केल्या आहेत.

या दरम्यान आरटीओ, पुणे स्टेशन, रुबी हॉल, बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही सात स्थानके आहेत. त्यांच्या निविदा अद्याप मंजूर झालेल्या नाहीत. साडेसात किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुमारे २७२ खांबांवर असेल. पहिल्या टप्प्यात रामवाडी ते फिनिक्‍स मॉल दरम्यान मेट्रोचे काम सोमवारपासून सुरू होईल. त्यामुळे रविवारपासून बीआरटी मार्ग बसच्या वाहतुकीसाठी बंद झाला आहे, अशी माहिती या टप्प्याचे प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश वाघमारे यांनी दिली.  पर्णकुटी पोलिस चौकी ते गुंजन चित्रपटगृहादरम्यानचे काम येत्या १० दिवसांत सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

शिवाजीनगर स्थानकाचे स्थलांतर मार्चपर्यंत 
मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर बस स्थानकाचे पर्यायी जागेवर स्थलांतर करावे लागणार आहे. परंतु, त्यासाठीची मुळा रस्ता येथील कृषी महाविद्यालयाची ११ हजार चौरस मीटर जागा महामेट्रोला अद्याप उपलब्ध झालेली नाही. ही जागा मिळाल्यावर तेथून स्थानक कार्यान्वित होईल, अशी पद्धतीने ती विकसित करावी लागणार आहे. त्यासाठी दोन-तीन महिने लागतील, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले. त्यामुळे स्थानकाचे स्थलांतर मार्च महिन्यापर्यंत लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका झाडामुळे महिनाभर रखडले काम 
वनाज- रामवाडी मेट्रो मार्गावर कर्वे रस्ता येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याशेजारून मेट्रो मार्ग मुठा नदीच्या पात्रात जाणार आहे. त्यामुळे तेथील सुमारे २७ स्टॉल्स हलविण्यात आले आहेत. तेथे एका झाडाचे पुनर्रोपण करायचे आहे. त्यासाठी महामेट्रोने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे एक महिन्यापासून परवानगी मागितली आहे. परंतु, प्राधिकरणाने अद्याप परवानगी दिली नसल्यामुळे तेथे एक महिन्यापासून काम करण्यावर मर्यादा आल्या आहेत, असे महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत