नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांचे राजकीय सल्लागार राहिलेले प्रशांत किशोर JDU मध्ये सामिल

रायगड माझा वृत्त 

पाटणा – राजकीय क्षेत्रात रणनीतिकार म्हणून नावारूपास आलेले इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय- पॅक)चे संस्थापक प्रशांत किशोर आता स्वत:च राजकीय मैदानात उतरत आहेत. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूमध्ये प्रवेश केला. रविवारी पाटणा येथे जदयू कार्यकारिणीच्या बैठकीत किशोर यांनी औपचारिकरीत्या जदयूत प्रवेश केला. राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करून विजयाचा रामबाण उपाय सांगणाऱ्या रणनीतिकार प्रशांत किशोर यांची २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत मोठी भूमिका होती.

 

 

गेल्या आठवड्यातच प्रशांत किशोर यांनी निवडणुकीत राजकीय व्यूहरचना देणे सोडून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करणार असे स्पष्ट केले होते. हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये त्यांनी आपली ही इच्छा व्यक्त केली होती. राजकारणातील चाणक्य म्हणूनही ओळखल्या जाणारे प्रशांत किशोर यांनी मोदींसह नितीश कुमार यांनाही मोठा राजकीय विजय मिळवून दिला आहे. सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा उडाल्या तेव्हापासूनच नितीश आणि प्रशांत यांच्यातील भेटी-गाठी वाढल्या होत्या. ते जदयूमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चितच मानले जात होते. याच गोष्टीची रविवारी अधिकृत घोषणा झाली आहे.

You Might Also Like
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत