नर्मदेत बोटीला जलसमाधी; पाच जणांचा मृत्यू, ३६ जणांची प्रकृती गंभीर

नंदुरबार : रायगड माझा ऑनलाईन 

नर्मदेत बोटीला जलसमाधी; पाच जणांचा मृत्यू, ३६ जणांची प्रकृती गंभीर

नंदुरबारच्या धडगाव येथील नर्मदा नदीच्या पात्रात मंगळवारी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत  पाच प्रवासी दगावले आहेत, तर ३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. धडगावच्या भुसा पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली. येथील स्थानिक आदिवासींमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी नर्मदा स्नानाला जाण्याची प्रथा आहे. त्यासाठीच काहीजण बोटीने नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जात होते. मात्र, या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने ही बोट बुडाली. स्थानिक लोक आणि प्रशासनाने यापैकी अनेकांना बाहेर काढले. यापैकी ३६ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, अजूनही नदीच्या पात्रात शोधकार्य सुरु आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत.

स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाकडे या दुर्घटनेबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. मात्र, बोटीतील चार ते पाच प्रवासी पोहत किनाऱ्याला लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. नदीच्या काठावर बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. स्थानिक प्रशासनाकडून याठिकाणी ८ रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत