नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रसंग; शशिकांत डोंगरे यांनी स्वखर्चाने खड्डे भरले

पनवेल: साहिल रेळेकर

खड्ड्यांमुळे वाहनचालकांना करावी लागते तारेवरची कसरत

नागरिकांनी मानले शशिकांत डोंगरे यांचे आभार

नवीन पनवेल आणि पनवेलला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने पुलावरून वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे दिवसभर वाहतूक कोंडी देखील होत असल्याने वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील मोठी डोकेदुखी ठरत आहे. पनवेलला जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूच्या सुरुवातीस भलेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक जीव मुठीत धरून वाहने चालवतात. खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला अद्यापही मुहूर्त सापडत नाही. त्यामुळे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेकदा लहानमोठे अपघात घडतात.

आज (शनिवार दि.२४ जुलै) सकाळच्या सुमारास दोन दुचाकीस्वार पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होता होता थोडक्यात बचावले. सदरची बाब शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख शशिकांत डोंगरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पुलावरील खड्डे भरण्यासाठी कामगार घेऊन त्याठिकाणी हजर झाले. शनिवारी सकाळपासूनच शशिकांत डोंगरे यांनी पुलावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली. त्याचप्रमाणे पुलावर यापुढेही खड्डे पडल्यास नागरिकांनी सदर बाब निदर्शनास आणून द्यावी जेणेकरून त्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात येईल असे शशिकांत डोंगरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

पनवेलहुन नवीन पनवेल सह विचुंबे, आदई, सुकापूर, नेरे, वाजे, धोधाणी व इतर गावांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा उड्डाणपूल आहे. त्यामुळे नियमितपणे पुलावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु या उड्डाणपुलावर भलेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकही त्रस्त आहेत. यापूर्वी देखील पुलावरील खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात घडून वाहनचालकांना ईजाही झाली आहे. त्यातच पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडल्याने भर पावसात वाहचलकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अखेर प्रशासनाची वाट न बघता शनिवारी शशिकांत डोंगरे यांनी स्वखर्चातून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे शशिकांत डोंगरे यांच्या निस्वार्थी सामाजिक उपक्रमाचे वाहनचालकांनी देखील आभार मानले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत