नवी मुंबईत लवकरच लेडीज स्पेशल बस !

रायगड माझा ऑनलाईन | नवी मुंबई

Image may contain: 1 person, standing, sky, bus and outdoorमहिलांकडून महिलांसाठी चालवल्या जाणार्‍या तेजस्वीनी बसेसचा शुभारंभ नवी मुंबई महापालिकेतर्फे लवकरच केला जाणार आहे. नवी मुंबई महापालिका परिवहन विभागास या महिन्यात 10 नवीन मिनी बसेस देण्यात येणार असून 8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनी महापालिकेतर्फे तेजस्वीनी योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.

महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने महिला चालक व वाहकांच्या नियुक्त्या केल्या असल्या तरी राज्यातील कोणत्याही स्थानिक स्वराज संस्थेतर्फे अद्याप या नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. असे असले तरी तेजस्वीनी योजनेची नवी मुंबई तसेच राज्याच्या इतर भागात अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यासंदर्भात बोलताना नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामास्वामी एन. म्हणाले, तेजस्वीनी योजनेंतर्गत राज्य सरकारने महापालिकेला महिलांसाठीच्या खास बसेससाठी 2.5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातून 25 लाख रुपयांना एक याप्रमाणे 10 बसेस खरेदी करण्यात आलेल्या आहेत. 30 महिला प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बसमधून केवळ महिलांनाच प्रवास करता येणार आहे. या बसचे वाहक, चालक हेही महिलाच असणार आहेत. या बसेसच्या माध्यमातून महिला प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. सर्वात कमी किंमत असलेल्या टाटा मोटर्सला या योजनेतील बसेस पुरवण्याची निवीदा मंजूर करण्यात आली आहे.

सध्या नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसेसनी रोज 2.25 लाख लोक प्रवास करत असतात. यामध्ये नोकरदार महिला तसेच शाळा, महाविद्यालयाच्या मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे विविध कारणांनी पुरुष चालक तसेच वाहकांसमवेत महिला प्रवाशांचे अनेकदा खटके उडण्याचे प्रसंग ओढावत असतात. पुरुष चालक, वाहक तसेच पुरुष प्रवाशांच्या दृष्टीकोनासंदर्भात अनेकदा महिला प्रवाशांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. अशा या पार्श्‍वभूमीवर परिवहन विभागाच्या बसेसच्या ताफ्यात खास महिला बसेस सामील झाल्याने अशा प्रकारच्या तक्रारी संपुष्टात येवून महिला प्रवाशांची पिळवणूकही थांबेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई कार्यक्षेत्रात ही सेवा सुरु करण्याबरोबरच मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, मिरा भायंदर, पनवेल व उरण येथेही ही सेवा पुरवण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाकडे सध्या सुमारे 400 बसेस आहेत.लेडीज स्पेशल ट्रेनच्या धर्तीवर 10 नवीन बसेस कार्यरत राहणार आहेत. यामुळे वाहक व चालकाच्या निमित्ताने महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी गरजू आणि अर्थिकदृष्ट्या मागास घटकातील महिलांना रोजगाराच्या संधी देण्याचा निर्णय नवीमुंबई महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत