नवी मुंबई जगाच्या नकाशावर, पाच वर्षांत ६० हजार कोटींची गुंतवणूक

(रायगड माझा ऑनलाईन टीम)

देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये या परिसरामध्ये ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. देशातील प्रमुख बंदर, तीन औद्योगिक वसाहती, प्रस्तावित २३ स्मार्ट सिटीमुळे नवी मुंबईचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. देशातील सर्वात मोठा औद्योगिक बेल्ट होण्याचा बहुमान प्राप्त होणार आहे.
दोन दशकांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१९मध्ये पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत नवी मुंबई परिसरातील जल, रस्ते व हवाई वाहतुकीची सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे नवी मुंबई परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. मुंबईनंतर सर्वात मोठी औद्योगिक नगरी म्हणून या परिसराची ओळख निर्माण होऊ लागली आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तळोजा, रसायनी एमआयडीसी व जेएनपीटी बंदरामुळे यापूर्वीच औद्योगिकदृष्ट्या या परिसराला महत्त्व प्राप्त झाले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विकासाची व्याप्ती खोपोली ते पेणपर्यंत पोहोचणार आहे. विमानतळाच्या २५ किलोमीटर परिसर विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) म्हणून घोषित केला आहे. या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सिडकोची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. या परिसरात २३ स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहेत. जेएनपीटीच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचे कामही पूर्ण झाले आहे. भविष्यात न्हावा शेवा सी लिंक, कोपरखैरणे-विक्रोळी मार्ग, सायन-पनवेल महामार्गावर नवीन उड्डाणपूल व मुंबई-गोवा महामार्गाचे विस्तारीकरण यामुळे देशातील सर्वात चांगली वाहतूक व्यवस्था असणारे शहर म्हणून पनवेल व नवी मुंबईची ओळख निर्माण होणार आहे.
हवाई, जल व महामार्गांचे जाळे निर्माण होणार असल्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. पाच वर्षांत तब्बल ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामध्ये विमानतळाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या कामाचा समावेश असणार आहे. जेएनपीटी विस्तारीकरणासाठी १० हजार ७०० कोटी, नैना परिसरामध्ये ४ हजार कोटी, महामार्ग विस्तारीकरणासाठी १३ हजार कोटी, सिडको पायाभूत सुविधांसाठी तब्बल ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय खासगी विकासकांकडून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत