नवी मुंबई शहरात सिडकोच्या कृतघ्न कारभारा विरोधात नाराजी

नवी मुंबई : साईनाथ भोईर

पाच दशकापासून सिडको नवी मुंबई शहरातील जमिनीवर खोऱ्याने पैसे ओढत आहे. या कालावधीत सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली ठाणे शहरातील रुग्णांची काळजी घेण्यासाठी 16 कोटींची दौलतजादा करीत मुलुंड परिसरात कोव्हीड काळजी केंद्र सुरू करून नवी मुंबई शहराची प्रतारणा केल्याने स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी विरोधी पक्षनेते यांनी याविरोधात टीका करताना सिडकोला कृतघ्न ही उपाधी बहाल करत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली आहे.

सिडकोने रायगड व ठाणे जिल्ह्यातील ९५  गावांची जमीन संपादित करून नवी मुंबई शहराचा डोलारा उभा करत अब्जावधी रुपयांची उलाढाल केली.नागपूरच्या मिहान प्रकल्पाला आर्थिक रसद पुरवताना मोठ्या प्रमाणात राजकीय जुगलबंदी रंगली होती. मात्र आता सिडको संचालक मंडळ अस्तित्वात नसल्याने नगरविकास विभागाच्या कृपेने 16 कोटी रुपयांची तरतूद करून मुलुंड येथे कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. याविरोधात नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक व भाजप नेते दशरथ भगत यांनी सिडकोच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. नवी मुंबई मनपा येथे आयुक्त अभिजित बांगर यांच्या भेटीसाठी आले असताना भगत यांनी सिडको कृतघ्न असल्याची बोचरी टीका केली आहे. श्रीमंतीची मिजास मिरवणाऱ्या सिडकोचा पान्हा पुतणामावशीचा असल्याचा संताप आता व्यक्त होत आहे. दशरथ भगत यांनी नवी मुंबई शहरावर सिडको अन्याय करत असल्याची टीका केली आहे. कोरोना संसर्गाच्या मगरमिठीत संपूर्ण महाराष्ट्र सापडला आहे. आणि त्या मिठीतुन नवी मुंबई शहर देखील सुटले नाही. आणि अशा कठीण परिस्थितीत या शहराची जन्मदाती असलेल्या सिडकोने नवी मुंबई शहराला कोविड काळात मदतीचा आधार देण्याऐवजी दानशूर तेची मेहेरनजर शेजारच्या ठाणे मुलुंड परिसरात दाखवल्याने आता राजकीय जुगलबंदी रंगणार आहे. या शहरातील भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित करुन गडगंज श्रीमंत झालेल्या सिडकोला आज नवी मुंबईकरांचा विसर पडल्याचे सिडको खऱ्या अर्थाने कृतघ्न आहे. असे मत नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी व्यक्त केले.

मुंबई शहरावरील लोकसंख्येचा ताण कमी व्हावा म्हणून मुंबईला खेटूनच नवीन शहराची निर्मिती करण्याची सिडकोवर शासनाने जबाबदारी दिली.त्यानंतर १९७० मध्ये सिडकोने नवी मुंबईतील शेतकऱ्यांची बांधापासून जोत्यापर्यत शेतजमीन संपादन करण्यास सुरूवात केली आणि हे शहर वसवले. मात्र  ज्या  भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित केल्या त्या भुमिपुत्रांना ५० वर्षे झाली तरी सिडकोने अनुज न्याय दिला नाही. आणि आजही भूमीपुत्र त्यासाठी लढा देत आहे. मात्र शहर वसण्याच्या नावाखाली जमिनी घेतल्या त्या आज सिडकोने करोडो रुपयांना विकून गडगंज श्रीमंती कमवली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमीनिवर सिडको श्रीमंत झाली त्या शेतकऱ्यांकडे कोरोनाच्या महामारीत सिडको पुरते दुर्लक्ष करीत आहे. आज नवी मुंबई शहराची पालक म्हणून महापालिका जबाबदारी पार पाडत आहे. मात्र सिडकोने या शहराला जन्म घातला त्या शहराला अडचणीच्या काळात पालक म्हणून सिडकोने मदत करणे हे सिडकोचे दायित्व आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. सिडकोने मुंबईतील कोवीड रुग्णांच्या उपचारासाठी मुलुंड येथे १६ कोटी खर्च करून कोविड सेंटर उभारले आणि आता आणखी एक कोविड केंद्र सिडको मार्फत उभारणार असल्याचे मुंबईच्या महापौरांनी जाहीर केले आहे. संकट समयी एखाद्याला मदत करणे काही गैर नाही आणि अशा आपत्कालीन काळात ती केलीच पाहिजे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमीनिवर सिडको मोठी झाली त्या शेतकऱ्यांच्या शहराकडे दुर्लक्ष करून मदत न करता इतर शहरात मदत करीत सिडको सुटली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या बाबतीत सिडको कृतघ्न निघाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे मत नवी मुंबई पुनर्वसन समाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी व्यक्त केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत