नांदेड-पनवेल एक्सप्रेसला कर्जत थांबा

(रायगड माझा ऑनलाईन टीम)

नांदेड-पनवेल एक्स्प्रेसला येत्या २२ जानेवारीपासून कर्जत येथे थांबा दिला जाणार आहे. या थांब्यामुळे बदलापूर- अंबरनाथ ते कर्जत पट्ट्यातील शेकडो प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून आता त्यांना कर्जत येथून ही गाडी पकडणे शक्य होणार आहे. सध्या सहा महिन्यांसाठी हा थांबा जाहीर झाला असून या कालावधीत प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर हा थांबा कायमस्वरुपीदेखील मिळू शकतो.
मध्य रेल्वेने १६ ऑक्टोबर २०१६ रोजी हुजुर साहेब नांदेड-पनवेल ही एक्स्प्रेस सुरू केली. या एक्स्प्रेसचा शेवटचा थांबा पनवेल असल्याने ही गाडी कल्याणमार्गे जात नाही. त्यातच या गाडीला कर्जत येथे थांबाच नसल्याने कर्जतपासून अंबरनाथ- बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यातील शेकडो प्रवाशांना या गाडीचा काहीही फायदा होत नव्हता. त्यामुळे कर्जत येथे या एक्स्प्रेसला थांबा मिळावा, अशी मागणी केली जात होती.
अखेर या मागणीची दखल घेण्यात आली असून २२ जानेवारीपासून या गाडीला कर्जत येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे. कर्जत येथे या एक्स्प्रेसची वेळ सकाळी ८ वा २२ मिनिटांची असून एक मिनिटाचा थांबा तिला देण्यात आला आहे. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रभाकर गंगावणे यांनी ही माहिती दिली. थांब्याचा हा अवधी पुढील प्रवासात भरून काढण्याच्या स्पष्ट सूचना रेल्वे अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. २२ जुलैपर्यंत या एक्स्प्रेसला हा थांबा जाहीर झाला असून प्रवाशांनी कर्जत येथून प्रतिसाद दिल्यास हा थांबा कायमस्वरूपी होऊ शकतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत