नागपूरच्या पर्यटकांमागे धावली वाघीण!

चंद्रपूर : रायगड माझा वृत्त 

ताडोब्यातील आगरझरी बफर झोनमध्ये रविवारी सकाळी व्याघ्रदर्शनासाठी गेलेल्या नागपूर येथील पर्यटकांच्या जिप्सीचा ‘मधू’ वाघिणीने पाठलाग केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन जिप्सींच्या मध्ये अडकल्याने ही वाघीण चवताळल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, व्यवस्थापनाने सोमवारी गाइड आणि जिप्सीचालकांना सफारी करताना सुरक्षितता पाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. परिणामी या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. ताडोब्याच्या जंगलात सध्या वाघोबांचे दर्शन सुलभ झाले आहे. त्यामुळे पर्यटकांची प्रकल्पात गर्दी दिसून येत आहे. पण, वाघाला जवळून पाहण्यासाठी धडपडणाऱ्या पर्यटकांच्या अति उत्साहापायी वाघाजवळ गेल्याने प्रकल्पातील वाघ संतप्त होताहेत. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आगरझरी बफर झोनमध्ये नागपूर येथील पर्यटकांनी भरलेली एक जिप्सी वाघ पाहण्यासाठी गेली होती. वाघ पाहून परतत असताना याचदरम्यान एक वाघ जिप्सीमागे लागला. जिप्सीमध्ये बसलेल्या पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. या घटनेमुळे जिप्सीतील पर्यटक जोरजोरात ओरडत होते. दोन जिप्सीमध्ये अडकल्याने ही वाघीण चवताळली. तिला जाण्यास दुसरा मार्ग नसल्याने जिप्सीच्या मागे लागल्याचे समोर आले आहे. याबाबतचा एक १८ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या बाबीची गंभीर दखल ताडोबा व्यवस्थापनाने घेतली आहे. ताडोबा व्यवस्थापनाने सोमवारी गाइड व जिप्सीचालकांना यासंदर्भात सफारी करताना सुरक्षितता पाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दोन जिप्सीमध्ये अंतर आवश्यक करण्यात आले असून वन्यजीवांमध्ये व जिप्सीतदेखील सुरक्षित अंतर ठेवण्यास बजावण्यात आले आहे.

पर्यटकांनो, इकडे लक्ष द्या!
– ताडोब्यात फिरताना पर्यटकांनी सतर्क राहावे
– व्यवस्थापनाने घालून दिलेली शिस्त पाळावी
-पर्यटनादरम्यान वाघ व जैवविविधतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी
– दोन जिप्सींमध्ये आवश्यक अंतर ठेवावे
– वन्यजीव आणि जिप्सीमध्ये सुरक्षित अंतर ठेवा

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत