नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटात झळकणार रिंकू-आकाशची जोडी

रायगड माझा वृत्त

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत प्रसिद्धी मिळवणारी आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पहायला मिळणार आहे. सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी दोघांनाही अक्षरक्ष: डोक्यावर उचलून घेतलं होतं. मात्र यानंतर दोघे पुन्हा एकत्र आले नव्हते. पण आता नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटातून दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत. यासोबत दोघं बॉलिवूडमध्येही पदार्पण करतील.

गेल्या काही दिवसांपासून नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाची बरीच चर्चा सुरु आहे. अमिताभ बच्चन चित्रपटात असल्याने प्रेक्षकांनाही नागराज मंजुळे आणि अमिताभ यांचं एकत्रित काम पाहण्याची उत्सुकता आहे. अमिताभ यांचे सेटवरील काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात आता रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरचा प्रवेश झाल्याने चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

2016 मध्ये सैराट प्रदर्शित झाल्यानंतर रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यास चाहते नक्कीच उत्सुक असतील. पण या चित्रपटात दोघेही एकत्र दिसणार नसल्याचं कळत आहे.

झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर रिंकू आणि आकाश संस्थेतील फूटबॉलपटूंच्या भूमिकेत असणार आहेत. रिंकू आणि आकाश यांनी नागपुरात एक आठवडा शूटिंग केल्याचंही कळत आहे.

सैराट चित्रपटानंतर आकाश ठोसर महेश माजरेकरांच्या ‘फ्रेण्डशिप अनलिमिटेड’ आणि वेब सीरिज ‘लस्ट स्टोरीज’मध्ये झळकला होता. तर रिंकू राजगुरुचा ‘कागर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत