नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे संपूर्ण देशात संघर्षाचे वातावरण : शरद पवार

बारामती : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारत पेटला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीमुळे उत्तर आणि दक्षिण भारतात मोठा संघर्ष निर्माण होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते रविवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला होता. संसदेत त्याबद्दलची भूमिकाही मांडली.

त्यावरूनच आता देशात आग लागेल आणि संघर्षाचे वातावरण निर्माण होईल, असे पवारांनी सांगितले. हे आता दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही पसरले आहे. दक्षिण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात रविवारी यावरून मोठा हिंसक संघर्ष झाला. रविवारी सायंकाळी काढलेल्या मोर्चादरम्यान काही समाजकंटकांनी दिल्ली पर्यटन महामंडळाच्या बससह तीन बस, काही मोटारी आणि अनेक दुचाकी पेटवल्या. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिसही जखमी झाले. यानंतर पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून विद्यापीठाच्या आवारात अश्रुधुराचा मारा करण्यात आला. तसेच अनेक आंदोलकांना विद्यापीठाच्या परिसरातून अक्षरश: फरफटत बाहेर काढण्यात आले. कालच्या कारवाईदरम्यान पोलिसांनी १०० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, आज पहाटे या सर्वांची सुटका करण्यात आली. आसाममध्ये अद्यापही तणाव असून, लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. पोलिसांच्या गोळीबारातील दोन जखमींचा मृत्यू झाल्याने आंदोलनात जीव गमावलेल्यांची राज्यातील संख्या चार झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत