माथेरान : मुकुंद रांजाणे
दिवसेंदिवस इथे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असतांना मुख्य रस्त्यावरील जागा फेरीवाल्यांनी व्यापलेली असल्यामुळे पायी चालत असलेल्या पर्यटकांना चालण्यासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी नगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन फुटांचे फुटपाथ लोखंडी रेलिंग टाकून बनविण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी शेती होत नाही त्यामुळेच अनेक लोक हे मुख्य रस्त्यावर छोटेमोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवितात.या व्यावसायिकांमुळे पायी प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तर मागील काळात राजकीय मंडळींनी राजकारण केल्यामुळे काही व्यावसायिकांच्या बालहट्टा मुळेच मुख्य रस्त्यातील सहा फुटांचा भाग दगडमातीचा ठेवण्यात आलेला असून दोन्ही बाजूला पेव्हरब्लॉक बसविलेले आहेत.त्यामुळे धुळीचे प्रमाण काहीअंशी का होईना कमी झालेले आहे. परंतु अनेकदा घोडे आणि हातरीक्षा ही प्रमुख वाहने पेव्हरब्लॉक वरून प्रवास करीत असतात. त्यामुळेच पावसाळ्यात पेव्हरब्लॉक वरून चालण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नसते. त्यावेळेस मधल्या रस्त्यातील चिखलातून पर्यटकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना , वयोवृद्ध मंडळींना देखील मार्गक्रमण करावे लागते आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, रेल्वे स्टेशन आणि नौरोजी उद्यानापर्यंत सततची रहदारी असते. अशावेळेस रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले बसलेले असतात त्यातच हात रिक्षा आणि घोड्यांच्या वर्दळी बरोबरच पादचारी यांची गर्दी होते. याकामी या भागात रस्त्याच्या पूर्वेला तीन फुटांची लोखंडी रेलिंग टाकून केवळ पायी प्रवास करण्यासाठी उपयोगात आणणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे रस्त्याच्या फुटपाथवर बसणाऱ्या गरजवंत व्यावसायिक लोकांना एखादी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या मोलमजुरीचा प्रश्न मार्गी लागू शकतो.तेव्हाच सुट्टयांच्या हंगामात होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात येईल. असे स्थानिक मंडळी बोलत आहेत.
—————————— —————————
फुटपाथ रेलिंग केल्यामुळे पर्यटकांना खरेदीसाठी सोयीस्कर होणार असून मुख्य रस्त्यावर गर्दीची समस्या उद्भवणार नाही. त्याचबरोबर ज्यांची हँड टू माऊथ अशी परिस्थिती आहे अशा फुटपाथ वरील छोट्या छोट्या व्यवसायिक लोकांच्या उदरनिर्वावर कुठल्याही प्रकारे गदा येणार नाही. यासाठी त्यांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे नगरपालिकेने गांभीर्याने पाहणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
योगेश जाधव ,वनसमिती अध्यक्ष
शेयर करा