नागरी सुरक्षेला धोका असेल त्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद होणार?

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

तणावाच्या परिस्थितीत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारखा सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. आपत्कालीन स्थितीत सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांमुळे तणावात भर पडू नये, म्हणून सरकारने थेट सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत सल्लामसलत सुरु केली आहे. त्यासाठी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागितला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा किंवा नागरी सुरक्षेला धोका असेल तेव्हा फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम यासारखे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकतात. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत दूरसंचार मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे.

तणावाच्या स्थितीत इंटरनेट सुरु असेल, पण सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी आणण्याबाबतच्या पर्यायावर विचार सुरु आहे.दूरसंचार विभागानं 18 जुलै रोजी यासंदर्भातील पत्र टेलकॉम ऑपरेटर, भारतीय इंटरनेट सेवा प्राधिकरण, सेल्युलर ऑपरेटर्स एसोसिएशन ऑफ इंडियाला पाठवलं आहे. त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षेला धोका किंवा शांतता भंग होत असेल अशा वेळी सोशल मीडिया बंद ठेवण्याबद्दलचा विचार केला जातोय.

आयटी अॅक्ट 69 ए नुसार केंद्र सरकारला सोशल मीडियावर निर्बंध घालण्याचे अधिकार आहेत. त्याचा हवालाही पत्रात देण्यात आलाय. गेल्या काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून आफावांना ऊत आलाय. यातून जमावानं काही लोकांची हत्याही केली. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा सल्ला मागवला आहे.

कलम 69 A नुसार, कोणत्याही कॉम्प्युटर स्त्रोताद्वारे कोणतीही अफवा/सूचना जनतेपर्यंत पोहोचू नये, यासाठी आदेश देण्याचा अधिकार आहे.सद्या देशभरता सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांमुळे अनेक बळी गेले आहेत. व्हॉट्सअपद्वारे तर अफवा पसरण्याचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे व्हॉट्सअप अनेकवेळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिलं आहे.

व्हॉट्सअप मेसेजवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक ठिकाणी अफवांमुळे मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडियावर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत