नागोठण्यात मराठा समाज एकवटला ; बंदला संमिश्र प्रतिसाद

नागोठणे : महेंद्र म्हात्रे

आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या नागोठणे बंदला आज संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारी बारा वाजता येथील श्री जोगेश्वरी मंदिरापासून संजय महाडिक, चेतन कामथे, विनायक गोळे, नाना पवार, अल्विन नाकते, सुधाकर पत्की, सुदेश येरुणकर, सुरेश गिजे, रमेश केदारी, भरत गिजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत मराठा समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आला होता.
मंदिरापासून काढण्यात आलेला मोर्चा, शिवाजी चौक, बाजारपेठ, खुमाचा नाका, गांधी चौक, प्रभुआळी मार्गे पुन्हा मंदिराजवळ आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत होऊन अनेक वक्त्यांनी आंदोलनामागील भूमिका विषद केली. मोर्चात ग्रामपंचायत सदस्य अतुल काळे, ज्ञानेश्वर साळुंके यांचेसह जैन बांधव आणि इतर समाजबांधव सहभागी झाल्याने मोर्चाला एक वेगळीच धार आली होती. मोर्चात दिलेल्या घोषणांमुळे नागोठणे शहर त्यानिमित्ताने दणाणून गेले होते.
कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेवटचे वृत्त हाती मिळेपर्यंत एस. टी. बस वाहतूक सुरळीत चालू असल्याचे नागोठणे बसस्थानक कार्यालयाकडून सांगण्यात आले, तर रेल्वे वाहतूक सुध्दा सुरळीत असल्याचे रेल्वे स्थानकातून स्पष्ट करण्यात आले. शहरासह विभागात बंद दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसून महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत