नाणारची कार्यवाही थांबवा, अन्यथा परिणाम भोगावा!

शिवसेनेच्या मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : रायगड माझा 

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमधील प्रस्तावित तेल रिफायनरी प्रकल्पाला जनतेच्या विरोधानंतरही सौदी अरेबियातील कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. जनतेला अंधारात ठेवून हा प्रकल्प रेटून नेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज शिवसेना मंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. केंद्र सरकारने स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर करून तत्काळ नाणार रिफायनरी प्रकल्पाची कार्यवाही थांबवावी, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिला.

मंत्रिमंडळ बैठकीआधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाणारविषयी झालेल्या कराराचा तीव्र निषेध नोंदवला. याविषयीची माहिती दिवाकर रावते यांनी पत्रकारांना दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या करारावर चर्चा करण्याची मागणी केली, तसेच केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध नोंदवला.

केंद्र सरकारने नाणारचा करार करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अंधारात ठेवले आहे. जर मुख्यमंत्र्यांनाच याची माहिती मिळत नाही तर अन्य मंत्र्यांना कशी मिळणार असे रावते म्हणाले.

केंद्र सरकारने कोकणातल्या जनभावनेचा आदर करून या प्रकल्पाची कार्यवाही थांबवावी. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत उपस्थित होते.

शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारातमक भूमिका घेतली. केंद्रात परवा झालेल्या कराराची आपल्याला कल्पना नव्हती. मात्र, याबाबत उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चा करू असे त्यांनी आश्वासन त्यांनी दिल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत