नाणार प्रकल्पावरून प्रताप सरनाईक, नितेश राणेंकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न

नागपूर : रायगड माझा वृत्त 

नाणार प्रकल्पाच्या विरोधात आज विधानसभेत विरोधी पक्षासह शिवसेनेने गोंधळ घातला. या गोंधळातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. गोंधळामुळे कामकाज करणे शक्य नसल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

नाणार प्रकल्प : प्रताप सरनाईक, नितेश राणेंकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न

नाणार प्रकल्पाविरोधात नाणारवासीय आज नागपुरात आले आहेत. विधान भवनाबाहेर त्यांचे आंदोलन सुरू आहे. ही माहिती देण्यासाठी राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाँईट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत बोलण्याची परवानगी मागितली होती. परंतु, विधानसभाध्यक्षांनी ती फेटाळल्याने शिवसेना आक्रमक झाली. यावेळी आमदार नितेश राणे हे देखील आक्रमक झाले होते. प्रताप सरनाईक आणि नितेश राणे यांनी याप्रकरणी निषेध व्यक्त करत विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेने आपल्या कृत्याचे समर्थन केले आहे. प्रत्येक सदस्याला पाँईंट ऑफ इन्फर्मेशननुसार बोलण्याचा अधिकार आहे. परंतु, अध्यक्षांनी तो नाकारला. त्यांनी बोलायला परवानगी द्यायला हवी होती. नाणार कोकणाचा विनाश करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात शिवसेना नेहमी आक्रमक राहील, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

 

तर प्रताप सरनाईक यांनीही नाणार प्रकल्पाला सेनेचा कायम विरोध राहीन. यासाठी दहा वेळा निलंबित केले तरी चालेल आम्ही त्यासाठी तयार आहोत असे म्हटले. हजारो शेतकरी विधानभवनाच्या बाहेर आहेत. त्यांची व्यथा जाणून घेण्याची आम्ही मागणी केली होती. पण त्यांनी ऐकले नाही. आम्ही शिवसेना स्टाईलने राजदंड पळवला, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत