नायब तहसीलदाराकडून घेतली खंडणी, दोघे जाळ्यात

पोलिसांनी जप्त केलेली रक्कम आणि मोबाइल

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त

तलाठी असताना केलेल्या कामात उणिवा असल्याबाबत नायब तहसीलदाराला ब्लॅकमेल करून पन्नास हजारांची खंडणी घेताना दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (ता. 31) शिवेश्‍वर कॉलनी, हर्सूल येथे सायंकाळी करण्यात आली.

प्रेमदास तुकाराम चव्हाण (जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया बंजारा टायगर्स संघटना), नंदू बाळा चव्हाण अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात नायब तहसीलदार हरिश्‍चंद्र रंगनाथ सोनवणे (वय 54, रा. आदित्यनगर, शिवेश्‍वर कॉलनी, हर्सूल) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, ते सध्या जिंतूर (जि. परभणी) येथे नायब तहसीलदार आहेत. यापूर्वी ते वर्ष 2004 ते 2008 दरम्यान जटवाडा येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. तेव्हा तेथे केलेल्या कामात उणिवा भासवून त्यांच्याविरुद्ध अशोक आर. राठोड (संस्थापक, ऑल इंडिया बंजारा टायगर्स संघटना) यांच्यासह प्रेमदास चव्हाण, नंदू चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्तालय तसेच मंत्रालयात खोट्या तक्रारी, अर्ज दाखल केले. याद्वारे श्री. सोनवणे व शासकीय नोकरीतील इतरांविरुद्ध उपोषण, निवेदन देत नोकरी वाचविण्यासाठी ब्लॅकमेलिंग केले.निवेदनातून नाव वगळून ब्लॅकमेल न करण्यासाठी संशयितांनी सोनवणे यांना पन्नास हजारांची खंडणी मागितली. यानंतर ही रक्कम सोनवणे यांच्या घरी स्वीकारली. पैसे स्वीकारताच घरातच असलेल्या गुन्हे शाखेने संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेत खंडणीच्या रकमेसह एकूण एक लाख 35 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. संशयितांविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही कारवाई सहायक आयुक्त नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत यांच्या सूचनेनुसार, उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, विकास माताडे, नवाब शेख, विलास वाघ, वीरेश बने, संजयसिंह राजपूत, सुधाकर मिसाळ, धर्मराज गायकवाड यांनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत