नारायण राणे आपल्या नव्या पक्षाची करणार घोषणा, मुंबईत 1 ऑक्टोबरला घेणार पत्रकार परिषद

मुंबई – नारायण राणे आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील वाटचालीबाबत ते माहिती देणार आहेत. भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतरही नारायण राणे नेमकी काय भूमिका हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतच भूमिका स्पष्ट करण्यासाठी नारायण राणे 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दसऱ्यापर्यंत आपण आपली पुढची वाटचाल स्पष्ट करू, असं राणेंनी कुडाळमधील पत्रकार परिषदेत सांगितलं होते. शिवाय, कर्तृत्व असणा-याला काँग्रेस साथ देत नाही. त्यामुळे काँग्रेसला भविष्य नाही, अशी टीका करत 21 सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी पुढील निर्णय जाहीर करू, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका समर्थ विकास पॅनेलद्वारे लढवू, असेही ते म्हणाले होते. यानंतर राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. पण या भेटीत राणेंच्या भाजपा प्रवेशावर फार काही चर्चा झाली नाही. त्यामुळे आता आगामी पत्रकार परिषदेत राणे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

भाजपामध्ये जाणार की पक्ष काढणार?
राणे यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. घटस्थापनेदिवशी ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. पण तो निर्णय काँग्रेस सोडण्याचा, भाजपात जाण्याचा की, नवा पक्ष काढण्याचा असेल? याविषयी उत्सुकता आहे. राणे यांचा तूर्त भाजपाप्रवेश होणार नाही. दिवाळीपर्यंत ते ‘बाहेर’ राहून काँग्रेसमधून कोण-कोण सोबत येतात, याची चाचपणी करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

३१ जिल्हे पाठिशी
घटस्थापनेदिवशी मी माझा निर्णय जाहीर करणार, त्या वेळी कोण कोणाला धक्का देतो ते पाहू. महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कोकणी जनतेच्या भल्यासाठी मी आणि माझे दोन्ही पुत्र राजकारणात आहोत. राज्यातील ३१ जिल्हे माझ्या पाठीशी आहेत, असा दावाही राणे यांनी केला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.