नारायण राणे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

सिंधुदुर्ग : रायगड माझा वृत्त 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोकणात चांगलाच राजकीय धुरळा उडणार आहे.

                 

‘मालवण-कुडाळ मतदारसंघातूनच राणे विधानसभा निवडणूक लढवतील. तुम्ही त्यांना साथ द्या,’ अशा आशयाचं विधान नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. त्यामुळे कुडाळ मतदारसंघात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेनेचे वैभव नाईक अशी लढत रंगणार आहे. दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या कोकणातील राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागला. कारण कुडाळमधून वैभव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राणे पराभवाचा वचपा काढणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं. त्यामुळे यंदाची ली विधानसभा निवडणूक राणे कुटुंबियांसाठी कितपत यशस्वी ठरते हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत