नालासोपार्‍याच्या तिघांना वसईत जलसमाधी

विरार :रायगड माझा 

वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या नालासोपार्‍यातील तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. या घटनेची नोंद अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नालासोपार्‍यात राहणारे अभिनव शिंदे (17), राहुल राठोड (18) आणि रितेश घेगडमाळ (17) शनिवारी दुपारी वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. काही वेळाने तिघेही पोहोण्यासाठी समुद्रात उतरले. पहिला वादळी वार्‍यासह झालेला पाऊस तसेच भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी रितेशचा मृतदेह स्थानिकांना समुद्रकिनार्‍यावर आढळून आल्याने त्यांनी अर्नाळा सागरी किनारा पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. दरम्यान, संबंधित मुलांच्या कुटुंबियांनी तुळींज पोलीस ठाण्यात आपली मुले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर तपासकार्याला वेग आला. रविवारी सकाळी 11. वा अभिनव आणि राहुल यांचे मृतदेह आढळून आले.पोलिसांनी ते मृतदेह आगाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर  त्या दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत