नाशिक जिल्ह्यात अडीचशे गावांत पाणीटंचाई; टॅंकरने पाणीपुरवठा

नाशिक : रायगड माझा वृत्त 

Image result for water supply by tanker

आठ तालुक्‍यांत दुष्काळसदृश स्थितीमुळे टॅंकरची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील अडीचशेवर गावांत सध्या पाणीटंचाई असून, ५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, टंचाई निकषानुसार चार दिवसांत ९३ गावांत पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीची माहिती घेतली.

जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. बुधवारी (ता. १७) सिन्नर तालुक्‍यात आणखी चार टॅंकरची मागणी झाली. सिन्नर तालुक्‍यात टंचाई स्थिती तीव्र होत असून, १७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चांदवड, नांदगाव, मालेगाव, बागलाण व देवळा तालुक्‍यांचा दौरा केला. दौऱ्यात त्यांना नागरिकांच्या तीव्र भावनांचा सामना करावा लागला. टॅंकरच्या वाढत्या मागणीची दखल घेत शासनाने मंत्र्यांना दुष्काळी भागाच्या पाहणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्‍यातील दुष्काळी गावाचे पर्जन्यमान, आर्द्रता, पीक परिस्थिती आदीची कृषी, भूजल सर्वेक्षण विभागाकडून तांत्रिक माहिती संकलनाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील ९३ गावांत भेटी देऊन टंचाई माहिती संकलन सुरू केले आहे.

सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रोश; पाणी तापले
जिल्ह्यात एका बाजूला दुष्काळी स्थिती गंभीर बनलेली असताना दुसरीकडे जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याने त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. जायकवाडी धरणातील आकडेवारीच्या घोळाविरोधात चौकशीच्या मागण्या सुरू झाल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात आक्रोश सुरू केला आहे. त्यामुळे गोदावरीचे पाणी तापायला सुरवात झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत