ना छापा, ना काटा… क्रिकेट सामन्यात टॉसदरम्यान ‘शोले’ ची आठवण!

मलेशिया : रायगड माझा वृत्त

नाणेफेक केल्यावर नाणं सरळ जमिनीवर पडल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे? हो.. अर्थात मेगाब्लॉकबस्टर ‘शोले’ मधला ना छापा, ना काटा… हा सीन अनेकांनी पाहिला असेलच. खरंतर हिंदी चित्रपटांमध्ये अशाप्रकारचे सीन तयार केले जातात. परंतु मलेशियात झालेल्या अंडर १९ क्रिकेट सामन्यात हे प्रत्यक्षात घडलं.

मंगळवारी ९ जुलैला असा एक सामना झाला, ज्यात नाणेफेक तर झाली पण नाणं खाली पडलं तेव्हा कमालच झाली. क्रिकेटमध्ये खेळाची सुरुवात नाणेफेकीने होते. त्यानंतरच कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोणता संघ क्षेत्ररक्षण करणार हे निश्चित होतं. नेपाळ आणि हाँगकाँग यांच्यात अंडर १९ एसीसी अर्थात एशियन क्रिकेट काऊंसिल ईस्टर्न रीजन २०१९ चा अंतिम सामना मंगळवारी खेळवण्यात आला. नाणेफेकीसाठी नाणं उडवून हेड किंवा टेल अर्थात छापा-काटा विचारण्यात आलं. पण नाणं खाली आल्यावर ते कोणाच्याच बाजूने पडलं नाही. नाणं जमिनीवर सरळ पडलं. सामनाधिकाऱ्यांनी यानंतर पुन्हा नाणेफेक करण्यास सांगितलं. यावेळी नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या धम्माल प्रकारावर आयसीसीचीही नजर गेली. आयसीसीने एशियन क्रिकेट काऊंसिलचं ट्वीट रिट्वीट करुन, ”तुम्ही यापूर्वी असं कधी पाहिलं होतं का?” असं म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत