नितीशकुमार यांच्या मनातील चलबिचल

 

रायगड माझा वृत्त 

पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे जे अनेक प्रादेशिक मित्रं आहेत त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महाराष्ट्रात तर शिवसेना स्वबळावर लढण्याच्या घोषणा करत असते तर तिकडे काश्‍मिरात भाजपानेच पुढाकार घेऊन पी.डी.पी. शी असलेली युती तोडली आहे. परिणामी आता लक्ष लागले आहे ते बिहारकडे, जेथे आज जनता दल (यू) आणि भाजपाचे युती सरकार सत्तेत आहे. मात्र, अलीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची वक्‍तव्ये बघितली म्हणजे तेथे सर्व आलबेल आहे, असे दिसत नाही.

गेल्या काही महिन्यांपासून नितीशकुमार भाजपाबरोबरची युती तोडून विरोधी पक्षांच्या ‘महागठबंधन’ मध्ये परत येतील, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. जून महिन्याच्या शेवटी नितीशकुमार यांनी मुंबईत वैद्यकीय उपचार घेत असलेल्या लालूप्रसाद यांच्या तब्येतीची फोनवरून चौकशी केली. तेव्हापासून नितीशकुमार ‘महागठबंधन’मध्ये परत येतील या अफवांना ऊत आलेला आहे. बिहारमधील आजचे महत्त्वाचे नेते व लालूप्रसाद यांचे ज्येष्ठ पुत्र तेजश्री यादव यांनी नुकतेच जाहीर केले आहे की जरी नितीशकुमार यांना परत येण्याची इच्छा असली तरी आम्ही आता त्यांना परत घेणार नाही. आज तिशीत असलेल्या तेजश्री यादवांचा अननुभवच यातून व्यक्‍त होत होता. त्यांच्या कदाचित अजून लक्षात आलेले नसेल की राजकारण म्हणजे ‘जे शक्‍य आहे ते करण्याचा खेळ.’.

नितीशकुमार महागठबंधनात परत येतील की नाही हे काळच दाखवेल. त्यांनी मागच्या वर्षी महागठबंधन तोडून भाजपाबरोबर युती केली. ही कदाचित त्यांच्या राजकीय कारकिर्दीची घोडचूक ठरू शकेल. याचे कारण असे की आता जरी ते “महागठबंधन’मध्ये सामील झाले तरी त्यांना आता तो मान मिळणार नाही जो त्यांना “महागठबंधन’मध्येच राहिले असते तर मिळाला असता. तेव्हा तर नितीशकुमार यांच्याकडे सर्व देश नरेंद्र मोदीजींना समर्थ पर्याय म्हणून बघत होता. त्यांनी मागच्या वर्षी “महागठबंधन’ सोडून भाजपाशी जर युती केली नसती तर आज बिगर-भाजपा आघाडीच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार हा मान त्यांच्याकडे चालून आला असता. या “जर-तर’च्या गोष्टी आहेत. राजकारणात अशा गोष्टींना फारसे स्थान नसते. इथे रोकडा व्यवहार असतो.

राजकीय क्षेत्रात नेते आपल्या सोयीने युती करतात व गरज संपली, फायदे संपले की युती तोडतात. यात नवीन काहीही नाही. मात्र, जेव्हा एखादा राजकीय नेता असे वारंवार करतो तेव्हा तो समाजाचा विश्‍वास गमावून बसतो. आज नितीशकुमारांबद्दल अशीच स्थिती निर्माण झाली आहे. नितीश व लालू यांनी तरुणपणी राजकीय जीवनाची सुरुवात एकत्रपणे केली होती.

नंतर नितीशकुमारांनी चार राजकीय कोलांट उड्या मारल्या. ते सन 1996 मध्ये भाजपाप्रणीत रालोआत गेले. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते रेल्वेमंत्री होते. नंतर त्यांनी 2013 साली बिहारमध्ये भाजपाशी असलेली युती तोडली व रालोआला रामराम ठोकला. नंतर नितीशकुमार यांनी सन 2015 मध्ये लालूप्रसाद यांच्याशी युती करत बिहारमध्ये “महागठबंधन’चा यशस्वी प्रयोग केला. त्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळवले. तेव्हापासून, “नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर मोदीजींना आव्हान उभे करता येईल,’ अशी चर्चा सुरू झाली. मात्र, त्यांनी जुलै 2017 मध्ये महागठबंधनमधून बाहेर पडत भाजपाशी पुन्हा युती केली. या त्यांच्या निर्णयामुळे सर्वांना धक्‍का बसला होता व त्यांच्यावर विश्‍वासघाताचा आरोप केला होता. मतदारांनी “महागठबंधन’ला मतं दिली होती. “नितीशकुमार यांना एवढा विश्‍वास वाटत असेल तर त्यांनी विधानसभा विसर्जित करावी व नव्याने जनादेश घ्यावा,’ असे विरोधक आव्हान देत होते. पण नितीशकुमारांनी त्याकडे दुर्लक्ष करत भाजपाबरोबर मंत्रिमंडळ स्थापन केले. आता ते पुन्हा “महागठबंधन’मध्ये परत येण्याच्या तयारीत आहेत असे समजते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अलीकडे झालेल्या पोटनिवडणुकांत त्यांच्या पक्षाला मतदारांनी नाकारले आहे.

म्हणूनच नितीशकुमार भाजपाशी केलेल्या युतीतून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत .यामागे नितीशकुमार यांच्या आणखी काही महत्वाकांक्षा आहेत. त्यांना यथावकाश देशाचे राजकारण करायचे आहे व तसा त्यांचा अनुभवही आहे. त्यांचा पुढच्या वर्षी अस्तित्वात येणाऱ्या लोकसभेत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार असावेत असा प्रयत्न असेल. म्हणजे मग बिगर-भाजपाविरोधी पक्षांची ताकद कमी पडली, तर ते पुन्हा “महागठबंधना’त शिरू शकतील. सध्या नितीशकुमार यांना भाजपाबरोबरच्या युतीचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त दिसत असतील. त्यामुळे त्यांची चलबिचल सुरू आहे. शिवाय गेल्या वर्षभरात बिगर भाजपा राजकीय पक्षांनी जी राजकीय एकी दाखवली आहे, ते बघता भावी लोकसभा निवडणुका भाजपाला महाग पडणार आहेत, यात शंका नाही.

याचा जसा नितीशकुमार यांना अंदाज आहे तसाच भाजपालासुद्धा आहे. आज भारतातील राजकीय वातावरण असे आहे की भाजपाचे एकेक मित्र सोडून जात आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना व पंजाबातील अकाली दलाचे उदाहरण ताजे आहे. आज हे दोन्ही मित्र पक्ष भाजपावर नाराज आहेत. यात जर नितीशकुमार यांची भर पडली तर ते भाजपाला महाग पडेल. म्हणूनच मागच्या आठवड्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाटण्याला जाऊन नितीशकुमार यांची भेट घेतली व “भाजप-जदयू युतीत सर्व आलबेल आहे,’ असे जाहीर केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत