निवडणुकांचे सावट नसणारे महाराष्ट्रातील शेवटचे अधिवेशन

मुंबई : रायगड माझा वृत्त 

आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होणार असल्याने आजपासून सुरू झालेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे पूर्ण क्षमतेने चालणारे आणि कोणत्याही निवडणुकांचे सावट नसणारे शेवटचे अधिवेशन आहे.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागू होणार असल्याने मार्चमध्ये होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी 2019 मध्येच घ्यावे लागणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे राज्यसरकारला अर्थसंकल्प मांडता येणार नसल्याने काही दिवसच सुरू राहणाऱ्या या अधिवेशनात लेखानुदान मांडण्यात येईल.

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील तदतुदींची मुदत मार्च 2019 अखेरपर्यंत संपणार असल्याने 1 एप्रिल 2019 पासून पुढील अधिवेशनापर्यंत सरकारचा कारभार चालण्यासाठी हे लेखा अनुदान मांडण्यात येईल. केंद्रामध्ये सत्तास्थापना झाल्यानंतर देशभरातील आचारसंहिता संपुष्टात येईल आणि त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल.

मात्र त्यानंतर एक-दोन महिन्यांत राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुन्हा लागू होणार असल्याने त्याचे सावट पावसाळी अधिवेशनावर असेल. त्यामुळे या अधिवेशनातील अर्थसंकल्पात फडणवीस सरकारच्या प्रचाराचे प्रतिबिंब असेल. या पार्श्‍वभूमीवर जनतेच्या जास्तीत जास्त प्रश्‍नांची सोडवणूक आणि नवीन कायदे संमत करण्यासाठी याच अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत