निवडणुका कशा घ्यायच्या हे काँग्रेसने शिकवू नये – निवडणूक आयोग

रायगड माझा वृत्त 

विधानसभा किंवा कोणत्याही निवडणुका कशा घ्याव्यात, हे काँग्रेस पक्षाने आम्हाला सांगू नये अशी टीका निवडणूक आयोगाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आयोगाच्या वतीने मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात ही टीका करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते कमलनाथ आणि सचिन पायलट यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झाली. त्यावेळी आयोगाने हे उत्तर दिले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील निवडणुका कशा प्रकारे घ्याव्यात, याच्या सूचना या नेत्यांनी आपल्या याचिकांमध्ये केल्या आहेत. या राज्यांमध्ये येत्या दोन महिन्यांत निवडणुका आहेत आणि तेथे मोठ्या प्रमाणात बनावट मतदार असल्याचा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे.

या दोन नेत्यांनी दाखल केलेल्या याचिका बरखास्त कराव्यात आणि त्यांचा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, कारण हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे, अशी टीकाही आयोगाने केली.

“निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. मात्र हे नेते स्वतःच्या इच्छा आणि लहरीनुसार आयोगाला वाकविण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला कायदे व नियमांनुसार वागावे लागते, राजकीय पक्षांच्या लहरीनुसार नव्हे,“ असेही आयोगाने म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत