निवडणूक आयोगाने पाठवली खासदार सनी देओल यांना नोटीस;प्रचारासाठी केला मर्यादेपेक्षा जास्त खर्च

पंजाब : रायगड माझा वृत्त

पंजाबच्या गुरुदासपूर येथून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले अभिनेता-राजकारणी सनी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे. कारण, निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली असून प्रचारादरम्यान मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी ७० लाख रुपये इतकीच रक्कम खर्च करण्याची मर्यादा असताना सनी देओल यांनी ८६ लाख रुपये खर्च केले होते. याप्रकरणी देओल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली होती. मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे निवडणूक आयोगाच्या पडताळणीत आढळून आल्यास, अशा खासदारांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. अशा वेळी निवडणूक आयोग संबंधीत व्यक्तीची खासदारकी रद्द करून त्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवाराला विजयी घोषीत करु शकते.

भाजपाने मतदान तोंडावर असताना आयत्यावेळी गुरुदासपूर येथून सनी देओल यांना उमेदवारी दिली होती.देओल यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखर यांच्याविरोधात ही निवडणूक लढवली होती. तसेच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांचाच ८० हजार मतांनी पराभव केला होता.यापूर्वी गुरुदासपूर येथून भाजपाचे उमेदवार अभिनेते-राजकारणी विनोद खन्ना खासदार होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर या जागेसाठी भाजपा नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. तो त्यांना सनी देओल यांच्या रुपाने मिळाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत