निवडणूक निकालानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरेल – कॉंग्रेस

 

रायगड माझा वृत्त 

नवी दिल्ली -पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपशी एकत्रितपणे दोन हात करण्याबाबत विविध विरोधी पक्षांमध्ये व्यापक सहमती झाली असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. तसेच, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविषयीचा निर्णय निवडणूक निकालानंतर घेतला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीला आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी बाकी आहे. त्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसच्या गोटात आतापासूनच हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने दोन टप्प्यांचा कृती आराखडा निश्‍चित केला आहे. पहिल्या टप्प्यात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यावर भर दिला जाणार आहे.

तर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक निकालाच्या आधारे नेतृत्वाच्या मुद्दा पुढे केला जाईल. निवडणुकीनंतरच्या आडाख्यांवर आताच चर्चा करणे विरोधी आघाडीत फाटाफूट करणारे ठरेल, असे पक्षाला वाटत आहे.

उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांत भाजप बऱ्याचशा जागा गमावू शकतो. त्यामुळे त्या राज्यांत योग्य पद्धतीने विरोधी आघाड्या अस्तित्वात आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवले जाऊ शकते, असे कॉंग्रेसला वाटत असल्याचे त्या सुत्रांनी नमूद केले. एवढेच नव्हे तर, लोकसभेत तब्बल 80 खासदार पाठवणाऱ्या उत्तरप्रदेशातील रणनीतीबाबत कॉंग्रेस, सप आणि बसपमध्ये व्यापक समझोता झाला आहे. आता जागावाटपाच्या तपशीलावर काम सुरू आहे, असे सूूतोवाचही सुत्रांनी केले.

महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, छत्तिसगढ आदी राज्यांत पुढील लोकसभा निवडणुकीत संख्येच्या दृष्टीने बरेच काही कमावता येईल. त्यामुळे आपण विरोधी आघाडीच्या केंद्रस्थानी पोहचू, असा विश्‍वास कॉंग्रेसला वाटत आहे. चालू वर्षाच्या अखेरीस राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तिसगढ या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तिन्ही ठिकाणी जिंकण्याचा ठाम विश्‍वास पक्षाला वाटत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी राज्य पातळीवर समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे सर्वाधिकार कॉंग्रेसने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले आहेत. मात्र, प्रत्येक राज्यात आघाडी करण्यापूूर्वी प्रदेश शाखांच्या मतांना महत्व दिले जाणार आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपशी हातमिळवणी करण्याच्या मुद्‌द्‌यावर कॉंग्रेसमध्ये विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, त्या राज्यांमधील प्रदेश शाखांची भूमिका ध्यानात घेऊनच पुढील पाऊल उचलले जाईल. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्रपक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत. असे असले तरी विचारसरणी भिन्न असल्याने शिवसेनेशी समझोता करण्याचा विचार कॉंग्रेस करणार नसल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत