नॅनो एज डिस्प्लेयुक्त असुसचे दोन लॅपटॉप भारतात दाखल

असुस कंपनीने नॅनो एज या प्रकारातील डिस्प्ले असणारे विवोबुक एस १५ आणि झेनबुक युएक्स४३० हे दोन लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत सादर केले आहेत. नॅनोएज या प्रकारातील डिस्प्ले हा वैशिष्ट्यपूर्ण असून यात बॉडी आणि डिस्प्ले यांचे गुणोत्तर ८० टक्के इतके असते. अर्थात यातील डिस्प्लेचे आकारमान हे जास्त असून याच्या कडा अतिशय बारीक असतात. असुस विवोबुक एस १५ आणि झेनबुक युएक्स४३० या दोन्ही मॉडेलमध्ये याच प्रकारचे नॅनोएज डिस्प्ले प्रदान करण्यात आले आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये इंटेलने अलीकडेच जाहीर केलेले आठव्या पिढीतले अत्यंत गतीमान असे प्रोसेसर्स असून याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य अनुक्रमे ५९,९९० आणि ७४,९९० रूपयांपासून सुरू होणारे आहेत.

असुस विवोबुक एस १५ हा लॅपटॉप १५.६ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. यात अवघ्या ७.८ मिलीमीटर आकाराची कडा असेल. या डिस्प्लेचा १७८ अंशात वापर करणे शक्य आहे. याचे मुख्य आवरण अ‍ॅल्युमिनियमचे असून याला सोनेरी रंगाचे आवरण प्रदान करण्यात आले आहे. हा लॅपटॉप अवघ्या १७.९ मिलीमीटर जाडीचा असून याचे वजन फक्त १.७ किलोग्रॅम इतके असेल. यात २.१ गेगाहर्टझ् इंटेल कोअर आय ७-८५५०यू हा अद्ययावत प्रोसेसर असून याला एनव्हिडीया एमएक्स१५० या ग्राफीक कार्डची जोड असेल. याची रॅम १६ जीबीपर्यंत तर स्टोअरेजसाठी एक टेराबाईटपर्यंतचे पर्याय असतील. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर ही बॅटरी फास्ट चार्जींग तंत्रज्ञानामुळे ४९ मिनिटांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील असेल. हा लॅपटॉप ड्युअल बँड वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीसह युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, युएसबी ३.१ आदी पोर्टने सज्ज असेल.

तर असुस झेनबुक युएक्स४३० या मॉडेलमध्येही नॅनोएज या प्रकाराचाच मात्र १४ इंची फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) अँटी ग्लेअर डिस्प्ले असेल. यात २.१ गेगाहर्टझ् इंटेल कोअर आय ७ हा प्रोसेसर असून याची रॅम १६ जीबीपर्यंत तर स्टोअरेजसाठी ५१२ जीबीपर्यंतचे पर्याय असतील. यात हर्मन कार्दोनचे अतिशय दर्जेदार स्पीकर प्रदान करण्यात आले आहेत. यातहीड्युअल बँड वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीसह युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, युएसबी ३.१ आदी फिचर्स असतील. हे दोन्ही लॅपटॉप ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. हे दोन्ही लॅपटॉप विंडोज १० या प्रणालीवर चालणारे आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत