नॅरोगेज रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक म्हणून एका महिलेला संधी

माथेरानच्या महाराणीची पहिली महिला चालक शुभांगी खोब्रागडे

माथेरान : श्वेता शिंदे

माथेरान मिनी ट्रेनच्या १११ वर्षाच्या इतिहासात एका ऐतिहासिक घटनेची नोंद झाली . नॅरोगेज रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक म्हणून एका महिलेला संधी मिळाली . नेरळ माथेरान मिनीट्रेन या गाडीवर शुभांगी खोब्रागडे या महिलेने सहायक चालक म्हणून काम करत हे आव्हान स्वीकारले.

आजच्या युगात पुरुषांच्या बरोबरीला महीला देखील उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अनेक क्षेत्रात महिलांनी स्वतःला सिद्ध केले आहे. गेल्या ६ वर्षा पासुन कुर्ला येथील डीझेल लोको शेडमध्ये कार्यरत असलेली नागपुरची कन्या शुभांगी खोब्रागडे यांची नियुक्ती २० जुन पासुन नेरळ माथेरान सेक्शन मध्ये नेरॉगेज रेल्वे मार्गावर सहाय्यक पायलट म्हणून करण्यात केली. यावेळी वरीष्ठ पायलट आर.जी.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेनची यशस्वी सफर करुन नवा इतिहास घडविला आहे.

यावेळी नेरळ येथुन मिनी ट्रेन घेऊन दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रवास सुरू केला आणि सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास माथेरान स्थानकात मिनी ट्रेन येऊन विसावली. या नेरॉगेज रेल्वे मार्गावर सहाय्यक चालक म्हणून नियुक्ती झाल्याने मी स्वताला नशीबवान समजते असे समाधान व्यक्त करत आपला विलक्षण अनुभव यावेळी शुभांगी खोब्रागडे यांनी सांगितला.

पर्यटकांचे खास आकर्षण असलेली माथेरानच्या मिनी ट्रेन सेवेत पर्यटकांना अधिक सुख सुविधा मिळवुन देण्यासाठी रेल्वे प्रशासन एक पाऊल पुढे टाकत मिनी ट्रेन सोबत विदेशी पर्यटकांना प्रामुख्याने वाफेवर चालणारे इंजिन आकर्षित करीत असते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने वाफेवरचे इंजिन डीझेलमध्ये परावर्तित करुन प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज केले आहे. येणाऱ्या काळात मिनी ट्रेनच्या पुर्वीच्या नियोजित सर्व फेऱ्या सुरु करुन नेरळ माथेरान नेरॉगेज मार्गावर रेल्वे क्रांती करण्याच्या दृष्टीने या रेल्वे मार्गावर चालकांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा हा प्रयत्न असल्याचे समजते.यासाठी प्रथमच महीला सहाय्यक पायलटला या मार्गावर संधी मिळाल्याने आजची मिनी ट्रेनची सफर ऐतिहासिक मानली जात असल्याने यावेळी उपस्थित रेल्वे कर्मचार्यांनी शुभांगी यांचे नेरळ माथेरान सेक्शन मध्ये स्वागत केले.

घाट सेक्शनमध्ये ट्रेन चालवणे माझं पहिल्यांदाच होत. त्यामुळे मला दडपण आले होते. मात्र माझंही मुख्य चालक यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले. नेरळ ते माथेरान माझा हा पहिला प्रवास अविस्मारणीय आहे.-  शुभांगी खोब्रागडे 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत